अंंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजप-मनसे हे दोघे युतीची गणिते जुळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने चमकदार कामगिरी केली होती. भाजप-मनसे यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, त्यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यास मनसे आणि भाजपचे स्थानिक नेते तयार नाहीत.आगामी निवडणुकीत शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपतील नगरसेवक दोन गटांत वाटले गेले आहेत. शहरात भाजपने आपली ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी ‘एक साथ चलो’चा नारा दिला आहे. दुखावलेले पदाधिकारी आणि नगरसेवकांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या प्रयत्नांना कितपत यश येते, हे सांगता येत नसेल, तरी भाजपने शिवसेनेचा मुकाबला करण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी मनसेला सोबत घेण्याची तयारी सुरू केली आहे. मनसेचे केवळ दोन नगरसेवक असून त्यांचा चार ते पाच प्रभागांत चांगला प्रभाव आहे. मात्र, मनसेला सोबत घेतल्याने इतर काही प्रभागांतील शिवसेनेच्या विचाराला मानणारी पण सत्तेकरिता सेनेने तडजोड केल्याने दुखावलेली काही मते भाजपकडे वळवणे शक्य होईल, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांना वाटते.भाजपचे नेते गुलाबराव करंजुले म्हणाले की, मनसेसोबत युतीचा कोणताही प्रस्ताव नाही. वरिष्ठ पातळीवर यासंदर्भात निर्णय होणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. मात्र, भाजपच्या एका गटाकडून सांगण्यात येत आहे की, आम्ही स्वबळाचा नारा दिला असला, तरी काही नगरसेवक हे मनसेसोबत लढण्याच्या तयारीत आहेत. मनसेचे नगरसेवकदेखील भाजपसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मनसेच्या स्थानिक नेत्यांनी आ. राजू पाटील यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. भाजपसोबत जाण्याचा निर्णय आणि ती चर्चा वरिष्ठ पातळीवर होणार आहे. त्यामुळे मनसे आणि भाजप एकत्रित येण्याचा पहिला प्रयोग अंबरनाथमध्ये होणार किंवा कसे, याची उत्सुकता वाढली आहे.>भाजपमध्ये मतभेदअंबरनाथ नगरपालिकेतील कानसई सेक्शन भागातील तीन आणि वडवली भागातील तीन अशा सहा ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या जागा मनसे पूर्ण क्षमतेने लढवणार आहे. दुसरीकडे, भाजपदेखील यंदाच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याच्या तयारीत आहे. मनसेसोबतच्या युतीबाबत भाजपमध्ये काहीसे मतभेद आहेत. या पक्षाचे काही स्थानिक पदाधिकारी स्वबळावर लढण्यास इच्छुक आहेत, तर भाजपचा एक गट मनसेसोबत युती करण्याच्या मानसिकतेत आहे.
भाजप-मनसेचे सूत जुळणार?, भाजप, मनसेच्या नगरसेवकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 1:23 AM