उल्हासनगर : भाजप नगरसेविकेचा पती दीपक सोंडे याच्यासह त्याच्या चार हस्तकांनी व्यावसायिक नरेश रोहरा यांना जीवे मारण्याची धमकी देऊन एक कोटीची खंडणी मागितल्याचा गुन्हा हिललाइन पोलीस ठाण्यात दाखल झाला. सोंडेविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.उल्हासनगर कॅम्प नं-५, सेक्शन ३५ येथील कार्यालयासमोर नरेश रोहरा ३ जानेवारी रोजी शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता उभे असताना दीपक सोंडे याच्या चार हस्तकांनी जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना एक कोटींची खंडणी मागितली. त्यानंतर, दुपारी साडेबारा वाजता सोंडे याने मोबाइलवर फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार रोहरा यांनी हिललाइन पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीवरून दीपक सोंडेसह त्याच्या चार हस्तकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याने ज्यांना खंडणी मागितली, ते नरेश रोहरा हे केबल व्यावसायिक असून, त्यांच्याशी सोंडे याचा कोणताही वाद नव्हता.सोंडेच्या पत्नी आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, नंतर शिवसेनेत आणि शिवसेनेतून काँग्रेसचा प्रवास करत, सध्या भाजपमध्ये नगरसेविका आहेत. त्या सलग चारवेळा निवडून आल्या आहेत. त्यांनी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती व पावसाळ्यात पाणी जिरवण्याची यशस्वी मोहीम शहरात राबविली आहे.>न्यायालय परिसरातील प्रकरणात सोंडे आरोपीखंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दीपक सोंडे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी सर्वश्रुत आहे. जवळपास २० वर्षांपूर्वी उल्हासनगर न्यायालयाच्या आवारात शिवसेनेचे स्थानिक नेते गोपाल राजवानी यांच्या झालेल्या हत्येमध्येही सोंडेचा सहभाग होता.१९९६ साली उल्हासनगर महानगरपालिकेत पहिल्यांदा शिवसेनेची सत्ता आली होती. त्यासाठी गोपाल राजवानी यांनी परिश्रम घेतले होते. त्यांच्या हत्येप्रकरणी दीपक सोंडेलाहीअटक झाली होती. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असून, मध्यंतरी सोंडेला पोलिसांनी तडीपारही केले होते.
भाजप नगरसेविकेच्या पतीने मागितली १ कोटीची खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 5:33 AM