अनिकेत घमंडीडोंबिवली: कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचा वाढत्या प्रार्दुभावाला महापालिकेची आरोग्य यंत्रणा जबाबदार आहे. अत्यंत ढिसाळ पद्धतीने कामकाज सुरू आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणखी वाढवणे योग्य ठरणार नाही. त्याला आमचा ठाम विरोध आहे. पुन्हा लॉकडाऊनमुळे महापालिकेची व सर्वसामान्यांची अर्थव्यवस्था पूर्णत: ढासळेल आणि त्यानंतर आर्थिक गाडा रुळावर आणण्यामध्ये खूप वेळ जाईल. आगामी काळात लॉकडाऊन वाढवण्यापेक्षा केंद्र, राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणे हाच योग्य उपाय आहे, असे मत आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.चव्हाण म्हणाले की, प्रशासनातील विशेषत: आरोग्य विभागातील अधिकारी तसेच ज्यांच्याकडे कोविड १९ चे काम दिले आहे ते अधिकारी जबाबदारीने वागत नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये रातोरात कोविड सेंटर उभे केले. तसेच डोंबिवली-कल्याणमध्ये का होऊ शकत नाही? क्रीडासंकुलातील २०० बेड्स च्या सेंटरसाठी एवढा वेळ का लागतोय? ठाण्यात हजार खाटांचे रुग्णालय पंधरवड्यात तयार होते तर मग इथे का होत नाही? यासाठी पालकमंत्री शिंदेंनी लक्ष घालणे गरजेचे आहे.कोविडसाठी सहा अधिकारी पाठवले आहेत असे सांगण्यात येते, तर मग ते अधिकारी आहेत कुठे? आम्हाला त्यांची नावेही माहिती नाहीत. त्यांनी कधीही संपर्क साधला नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले.>महापालिकेच्या आस्थापना विभागातील ९० रिक्त पदे आतापर्यंत का भरली नाहीत? युतीच्या राज्यामध्ये ती प्रलंबित फाइल तातडीने मंजूर करवून घेतली होती. तसेच आता आरोग्य धोक्यात आले असताना जो निधी सूतिकागृहासाठी चव्हाण यांनी मंजूर करून घेतला होता, तो कोट्यवधींचा निधी ६७ ‘क’प्रमाणे का वापरला जात नाही? त्यातून रुग्णालये अद्ययावत होऊ शकतात. त्याला खोडा कोण घालत आहे, असा सवाल चव्हाण यांनी केला.
CoronaVirus News : लॉकडाऊन वाढवण्यास भाजपचा विरोध : रवींद्र चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:16 AM