अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ १५ नोव्हेंबरला संपत असून नव्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे यांच्यात चुरस आहे. शिवसेनेतील या दोन्ही गटांतील शत्रुत्वाचा लाभ उठवत शिवसेनेची या नगरपालिकेतील सत्ता खालसा करण्याचे मनसुबे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी रचले आहेत.अंबरनाथच्या नव्या नगराध्यक्षपदासाठी १५ ते २० नोव्हेंबरच्या काळात निवडणूक होण्याची शक्यता आहे. १० ते १५ दिवसांवर ही निवडणूक आल्याने आता शिवसेनेतील इच्छुकांनी पक्षाकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वाळेकर यांच्या कुटुंबातील तीन सदस्य हे नगरसेवक आहेत. त्यांचे लहान भाऊ राजेंद्र वाळेकर हे शहराचे उपनगराध्यक्ष आहेत, तर त्यांची पत्नी मनीषा वाळेकर या तिसºयांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. लहान मुलगा निखिल हाही नगरसेवक आहे. वाळेकर यांनी गेली अनेक वर्षे शहरप्रमुखपद सांभाळले आहे. यापूर्वी दोन वेळा त्यांनी नगराध्यक्षपदही भूषवले आहे. पक्षातील त्यांची निष्ठा आणि शहरात राबवण्यात येणारे विविध उपक्रम यांच्या जोरावर वाळेकर यांनी मनीषा वाळेकर यांना नगराध्यक्ष करण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. वारिंगे यांच्या घरातही तीन नगरसेवक आहेत. त्यात स्वत: वारिंगे, त्यांची पत्नी पूनम वारिंगे आणि भावाची पत्नी योगिता यांचा समावेश आहे. वारिंगे यांचे लहान बंधू नितीन हे या आधी नगराध्यक्षपदाचे दावेदार होते. त्यांना नगराध्यक्षपदाचे आश्वासन शिवसेना नेतृत्वाकडून दिले गेल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, नितीन यांची राजकीय कारणास्तव हत्या झाली. त्यांच्या हत्येनंतर पंढरीनाथ यांनी सूत्रे हाती घेतली. पक्ष संघटनेसोबत प्रामाणिकपणे काम केल्याने नगराध्यक्षपदाची माळ आपल्याच कुटुंबीयांच्या गळ्यात पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शेवटी, पक्ष जो निर्णय देईल, त्या निर्णयासोबत आम्ही राहू, असे वारिंगे यांनी स्पष्ट केले. वारिंगे गटाकडून पूनम यांचे नाव पुढे केले गेले आहे.नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव असल्याने आता शिवसेना नेतृत्व कोणाला संधी देणार, ते उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच स्पष्ट होईल. वाळेकर आणि वारिंगे यांच्यात राजकीय स्पर्धा असली व दोन्ही गट शिवसेनेतील असले, तरी ज्या गटाला उमेदवारी नाकारली जाईल, त्या नाराज गटाला सोबत घेऊन नगराध्यक्षपद मिळवण्याचे प्रयत्न भाजपातर्फे सुरू आहेत. भाजपा शिवसेनेसोबत पालिकेत सत्तेत असला, तरी सत्तेची गणिते बिघडवण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू आहेत.नगराध्यक्षपदासाठी २९ नगरसेवकांची गरज असल्याने हा आकडा गाठण्याचे प्रयत्न भाजपा करत आहे. शिवसेनेच्या नाराज गटाने ६ ते ९ नगरसेवकांची रसद भाजपाला पुरवली, तर सत्तेची गणिते बदलतील, असा विश्वास भाजपाचे स्थानिक नेते करत आहेत. अंबरनाथमधील सेनेची सत्ता हिसकावण्याचा प्रयत्न होत असताना आता शिवसेना कसा सुवर्णमध्ये काढते, ते पाहणे औत्सुक्याचे आहे.
गटबाजीतून शिवसेनेला सत्तेवरून खेचण्याचा भाजपाचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 4:01 AM