डोंबिवली: आगामी लोकसभा निवडणूकीत केंद्रामध्ये भाजपसमवेत शिवसेनेची युती होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नसतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कल्याण लोकसभेसंदर्भात प्रमुख पदाधिका-यांसह महत्वाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यामध्ये त्यांनी १ बुथ २६ कार्यकर्ते असे समीकरण स्पष्ट केल्याने भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी एकप्रकारे सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एकीकडे जरू युतीचे संकेत दिले जात असले तरी दुसरीकडे बुथ रचना मजबूत करण्यासाठी राज्यभरातील ४८ लोकसभा जागांच्या ठिकाणी दानवे जात असल्याने पक्ष स्ववळावर लढणार असल्याचे संकेत दिल्याचे स्पष्ट झाले.दानवे यांनी कल्याणमध्ये बुधवारी पत्रकार परिषद घेत पक्षाचे ‘बुथ’चे समीकरण स्पष्ट केले. तसेच कल्याण लोकसभेचा उमेदवार नेमका कोण असेल असा प्रश्न विचारला असता ते पक्ष ठरवतो असे सूचकपणे स्पष्ट केले. राज्यातील ९० हजार बुथ रचनेपैकी सुमारे ८८ हजार ठिकाणची रचना पूर्ण झाली असून अन्य ठिकाणचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे दानवे म्हणाले. कार्यकर्ते सक्रिय करणे, आणि पक्षाच्या कार्याची माहिती देण्यासाठी ठिकठिकाणी मेळावे घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले. सध्या २८८ विस्तारक पक्षाचा विस्तार करत असून त्यापैकी ४८ पुर्णवेळ विस्तारक असल्याचे ते म्हणाले. एका बुथवर २६ जणांची टीम कार्यरत असेल. एका कार्यकर्त्यांनी किमान ६० मतदारांना मतदान करायला लावायचे त्या दृष्टीने कार्यकर्ता सक्रिय करणे हाच दौ-यांमागचा मुख्य उद्देश असल्याचा पुर्नउच्चार त्यांनी केला. युती होणार की नाही या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ती संधी द्यायची असून आमच्याकडून सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे युती होणार यात आमच्या मनात कसलाही संदेह नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबर रोजी चलो अयोध्याची हाक दिली आहे, त्यांच्या त्या भूमिकेला भाजपाचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले. नाराज आमदार अनिल गोटे यांची नाराजी लवकरच पक्ष दूर करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६५०० कोटी रूपयांचे पॅकेज जाहिर केले होते त्याचे काय झाले? त्यावर दानवेंनी अजून राज्यातील सत्तेची पाच वर्षे पूर्ण व्हायची असून लवकरच तो निधी कसा दिला आहे याबाबत माहिती देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण लोकसभा प्रभारी नरेंद्र पवार, खासदार कपिल पाटील, आमदार गणपत गायकवाड, आमदार किसन कथोरे आदी उपस्थित होते.
भाजपाची स्वबळावर लढण्याची तयारी?; रावसाहेब दानवेंनी घेतला कल्याण लोकसभेचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 8:43 PM