सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका स्थायी समिती सभापती पदी शिवसेनेने समर्थन दिलेले भाजपचे बंडखोर सदस्य विजय पाटील निवडून आले. पाटील यांना ८ तर भाजपच्या जया माखिजा यांना ७ मते मिळाली. तर प्रभाग समिती क्र -१ व ३ च्या सभापती पदी भाजपच्या जयश्री पाटील व ज्याती भटीजा निवडून आल्या आहेत.
उल्हासनगर महापालिका स्थायी समिती मध्ये १६ पैकी ९ सदस्य भाजपचे असतांनाही पक्षातील अंतर्गत फुटीचा फायदा शिवसेनेने घेतला. भाजपचे बंडखोर समिती सदस्य विजय पाटील यांना सूचक, अनुमोदक देऊन सभापती पदासाठी निवडून आणण्यासाठी कंबर कसली. तसेच भाजपचे दुसरे सदस्य डॉ प्रकाश नाथानी याना समिती सदस्य पदाचा राजीनामा द्यायला लावला. त्यामुळे समिती मध्ये शिवसेना आघाडीचे बहुमत झाले. गुरुवारी दुपारी १ वाजता स्थायी समिती सभापती पदाची ऑनलाईन पद्धतीने निवडणूक होऊन शिवसेना समर्थक विजय पाटील यांना १५ पैकी ८ तर भाजपच्या जया माखिजा याना ७ मते मिळाली. एका मताने विजय पाटील यांचा विजय झाला. शिवसेनेच्या फडाफोडी मुळे भाजपचे बंडखोर व शिवसेना समर्थक विजय पाटील स्थायी समिती सभापती पदी निवडून आले आहे.
महापालिका प्रभाग समिती क्र २ व ४ च्या सभापती पदासाठी भाजपातील ओमी कलानी टीम समर्थक शुभांगी निकम व शिवसेना आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या अंजली साळवे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध सभापती पदी निवड झाली. तर गुरुवारी झालेल्या प्रभाग समिती क्र -१ व ३ च्या सभापती पदाच्या निवडणुकीतून शिवसेनेच्या सुरेखा आव्हाड व संगीता सफकाळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या जयश्री पाटील व ज्योती भटीजा यांची बिनविरोध निवड झाली. जयश्री पाटील भाजपातील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवक आहेत. तर ज्योती भटीजा पूर्वाश्रमीच्या साई पक्षाच्या नगरसेवक असल्याने शिवसेनेने त्यांच्या बाबत मवाळ भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, महापौर लिलाबाई अशान, ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मढवी, शिवसेना नेते धनंजय बोडारे आदी जण निवडणुकीवर लक्ष ठेवून होते.
भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
महापालिका स्थायी व प्रभाग समिती सभापती पदावरून भाजपात उभी फूट पडली. भाजपातील निष्ठवंतांना डावलून त्याच त्या नगरसेवकांना वारंवार पदे मिळत असल्याने, पक्षात असंतोष निर्माण झाला. यातूनच महापालिका व स्थायी समिती मध्ये बहुमत असताना महापौर, उपमहापौर पाठोपाठ स्थायी समिती सभापती पदी भाजपचा पराभव झाल्याची टीका भाजपचे युवानेते संजय सिंग यांनी केली. पक्षाने मुठभराच्या हाती शहरातील सत्ता व निर्णय घेण्याचा अधिकार दिल्याने भाजपची ही अवस्था झाल्याचे संजय सिंग म्हणाले.