मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना भेडसावणारी पाणी टंचाई हि पालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या काही नेत्यांनी निर्माण केल्याचा घणाघाती आरोप शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे . सोमवार पासून पालिका प्रभाग कार्यालयां बाहेर भाजपा आणि पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ शिवसेना घागर फोडो आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे .
मीरा भाईंदर शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईला महापालिकेतील सत्ताधारी भाजपा व प्रशासन जबाबदार आहे. तीव्र पाणी टंचाईने लोकांचे हाल सुरु आहेत. त्यामुळे येत्या सोमवार पासून महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाच्या समोर जनतेला घेऊन शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व शिवसैनिक 'घागर फोडो' आंदोलन सुरु करतील, असे आ. सरनाईक यांनी म्हटले आहे.
शहरात आधी पासून रहात असलेल्या जनतेला पाणी टंचाई भेडसावू नये म्हणून पाण्याची उपलब्धता पाहून नवीन विकास प्रकल्पाना नळ जोडण्या न देण्याचे धोरण हवे होते . जसे पूर्वी केले होते . पण पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांनी आपल्या सहयोगी विकासकांना व आपल्या स्वत:च्या विकास प्रकल्पाना पाणी पुरवठा भरपूर व्हावा यासाठी संगनमत केले . त्यामुळे आधी पासून राहणाऱ्या मीरा - भाइर्दरकरांचे पाणी नवीन प्रकल्पांना पळवल्या मुळे तसेच हे सर्व विकासक 'रेन वॉटर हार्वेस्टिंगची' योजना राबवत नसल्याने शहरामध्ये पाणी टंचाई निर्माण होत आहे असा आरोप केला आहे.
भाजपा व त्यांच्या काही नेत्यांनी स्वतःच्या आणि मर्जीतील विकासकांच्या प्रकल्पाना मनमानीपणे पाणी लाटणे , रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना न राबवणे , पाण्याचे ऑडिट न करणे , पाण्याची चोरी व गळती न रोखणे, शहरात स्वतःचा पाण्याचा स्तोत्र सुरु न करणे, तलाव - विहरींच्या पाण्याचा योग्य वापर न करणे, पावसाळी पाण्याचे नियोजन न करणे आदी अनेक कारणांचा पाढाच आ. सरनाईक यांनी वाचून दाखवला . पालिकेत नियमबाह्यपणे तसेच चोरीच्या नळ जोडण्यातून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला.
नविन बांधकाम प्रकल्पाना कनेक्शन देऊ नये
'जोपर्यंत सुर्या प्रकल्पाचे पाणी शहरामध्ये येत नाही तोपर्यंत सर्व नविन बांधकाम प्रकल्पांना दिलेले पाण्याचे कनेक्शन खंडीत करावे व येणा-या नविन विकास प्रकल्पाना पाणी कनेक्शन देऊ नये. तसेच ज्या काही नवीन प्रकल्पांमध्ये नागरिक रहावयास आलेले असतील त्या प्रकल्पातील विकासकांनी तेथील नागरिकांना पाणी पुरवठ्यांची जबाबदारी घेऊन टँकर अथवा अन्य मार्गाने त्या-त्या प्रकल्पांचा पाणी प्रश्न सोडवावा. परंतू आधी पासून राहणाऱ्या नागरिकांचे पाणी नवीन बांधकाम प्रकल्पांना देण्यास शिवसेनेचा ठाम विरोध असल्याचे आ. सरनाईक म्हणाले .