ठाणे : कोरोना रुग्णांसाठी महापालिकेच्या माध्यमातून ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु आता यावर राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने विरोध केल्यानंतर महापौरांनी भाजपला राजकारण न करण्याची विनंती केली होती. परंतु आता भाजपने शिवसेनेवर पलटवार करीत रुग्णालयासाठी नगरसेवक निधी का द्यावा असा सवाल केला आहे. आम्ही राजकारण करीत नसून आध कम्युनिटी किचन आणि आरोग्य साहित्य खरेदीत जो काही घोटाळा झाला आहे, तो आधी महापौर म्हणून आपण उघड करावा असे आव्हान भाजपचे गटनेते संजय वाघुले यांनी महापौरांना दिले आहे. तसेच या रुग्णालयासाठी आपला दवाखानाचा निधी द्यावा अशी मागणीही त्यांनी पुन्हा केली आहे. कोरोना रुग्णालयासाठी नगरसेवक निधी वापरण्याऐवजी आपला दवाखानाचा निधी वापरावा असे मत भाजपच्या नगरसेवकांनी व्यक्त केले आहे. त्यावरुन महापौर नरेश म्हस्के यांनी भाजपला शालजोडीतले लगावत हा विरोध केवळ राजकीय असल्याचा आरोप केला आहे. परंतु आता महापौरांनी केलेल्या प्रत्येक आरोपांचे खंडन भाजपने केले आहे. नगरसेवक निधी ऐवजी रुग्णालयासाठी आपला दवाखानाचा निधी पडून आहे, तो देण्यात यावा, अशी मागणी भाजपने लावून धरली आहे. हा निधी देऊ नये म्हणून तुमचे हात दगडाखाली अडकले आहेत का?, कोणाला कमिटमेंट केली आहे का? असे अनेक सवाल वाघुले यांनी आता उपस्थित केले आहे. दुसरीकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेली बैठक अनौपचारीक होती तर एमसीएचआयच्या आशर यांना का पाचरण करण्यात आले असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय जे ६० लाख मिळणार आहेत, त्यातून शहराच्या किंवा प्रभागाच्या विकासाची कामे होणार आहेत. परंतु सध्या जी काही कोरोनाची परिस्थिती ओढावली आहे, त्यात पालिकेच्या उत्पन्नावर देखील परिणाम झाला आहे, त्यामुळे नगरसेवक निधीही रुग्णालयासाठी दिला तर भविष्यात निधी बाबत अडचणी निर्माण होतील असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे राजकारण भाजपवाले नाही तर शिवसेन करीत असून शहरात जो आरोग्य साहित्य खरेदीचा आणि कम्युनिटी किचनचा घोळ उघडकीस आला आहे, त्याची आधी चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी अशी मागणीही वाघुले यांनी केली आहे. त्यात सदर रुग्णालयाचा आराखाडा अद्याप समोर आलेला नाही, नगरसेवक निधी व्यतीरिक्त इतर किती निधी खर्च होणार याचाही माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्या कामी देण्यात येणार नगरसेवक निधी हा अपुरा आहे. त्यामुळे त्यासाठी आपला दवाखान्याचा निधी वर्ग करण्यात यावा अशी विनंतीही त्यांनी केली आहे.