- राजू काळे
भाईंदर - येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपा व शिवसेना या मित्र पक्षांनी एकत्रित लढणार असल्याची घोषणा केल्याने त्याचा परिणाम मीरा-भाईंदर महापालिकेतील राजकारणात दिसून येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकमेकांसमोर विरोधात उभे ठाकलेल्या शिवसेनेने भाजपाच्या सबका साथ, सबका विकासाचे सुत्र अवलंबविण्याची शक्यता बळावल्याने काँग्रेस एकाकी पडणार असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे.
केंद्रासह राज्य सरकारात भाजपासोबत असलेल्या शिवसेनेने येत्या लोकसभा व विधानसभेत एकला चलो ची भूमिका जाहिर केली होती. यूतीसाठी शिवसेना कोणत्याही पक्षाकडे कटोरा घेऊन जाणार नसल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. तर युती झाले तर ठिक अन्यथा निवडणुकांत शिवसेनेला पटकण्याची भाषा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी वापरली होती. या सर्व भूमिका व भाषांना गुंडाळून भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांनी युती जाहिर केली. यामुळे २०१७ मधील मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत व तद्नंतर एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या भाजपा व शिवसेनेत आता समझोता होणार असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासूनच दिसू लागले होते. तसे अधिकृत विधान शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमात केले सुद्धा. यामुळे तुझे-माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना, असा भाईचारा या दोन पक्षांमध्ये मतदारांना दिसून आला. त्यातच या दोन्ही पक्षांची युती झाल्याचे जाहिर झाल्याने दोन्ही पक्षांच्या स्थानिक पुढाऱ्यांत अधिकृतपणेच दिलजमाई झाल्याचे राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे.पालिका निवडणुकीत भाजपा एक क्रमांकाचा पक्ष ठरल्याने आपसुकच पालिकेची सत्ता भाजपाच्या हाती आली तर विरोधी पक्षांत शिवसेना वरचढ ठरल्याने हा पक्ष एक क्रमांकाचा विरोधी पक्ष ठरला. शिवसेनेला भाजपाने नेहमी हक्काच्या पदासाठी तसेच आवश्यक दालनासाठी झुलत ठेवून गळचेपी केल्याने स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षांच्या नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकत्यांच राजकीय खुन्नस पैदा झाली होती. तर काही विकासकामे अत्यावश्यक असल्याचा दावा करीत भाजपाकडून ती जाणीपुर्वक शिवसेनेच्या बालेकिल्लयात करण्याचा प्रयत्न केला. त्याला शिवसेनेने विविध माध्यमातून जोरदार विरोध करुन त्या विकासकामांना झुलत ठेवले. जलकुंभ लोकार्पणाचा राडा असो कि शिक्षणासाठी राखीव असलेल्या भूखंडावर बाजार थाटण्याचा प्रकार. शिवसेनेने त्याला रोकठोक उत्तर दिले. युतीनंतर मात्र भाजपाई विकासाच्या मनसुब्याला शिवसेना पाठींबा देणार असल्याची चर्चा शहरात तसेच राजकीय वर्तुळात सूरु झाली आहे. यामुळे दुसय््राा क्रमांकाचा विरोधी पक्ष असलेली काँग्रेस मात्र एकाकी पडणार असल्याचे बोलले जात असल्याने या दोन्ही पक्षांना खय््राा अर्थाने अच्छे दिन येऊन शहराचा विकास सबका साथ या धोरणावर होणार असल्याची उपहासात्मक चर्चा सुरू झाली आहे.
भाजपाने शहराच्या हितासाठी आणलेल्या विषयांना शिवसेना पाठींबा नक्कीच देईल. शहराच्या हितासाठी नसलेले तसेच स्वार्थासाठी असलेल्या विषयांना शिवसेना सभागृहात तसेच सभागृहाबाहेर कायम विरोधच करेल.
- आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना
युतीमुळे भाजपाच्या सबका साथ, सबका विकास धोरणाला शिवसेना सहकार्य करुन स्थानिक पातळीवर सुद्धा युती धर्म पाळेल, अशी अपेक्षा आहे. शिवसेनेने भाजपाला सहकार्य केल्यास शहराचा विकास सहज गतीशीलच होईल.
- चंद्रकांत वैती, उपमहापौर
युती धर्म पाळण्यासाठी विरोधी पक्षातील शिवसेनेने भाजपाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेस मात्र विरोधकांची भूमिका कायम राहिल. शहराच्या हितासाठी आम्ही सुद्धा कटीबद्ध असल्याने काँग्रेस कधीच एकाकी पडली नाही व पडणारही नाही. यंदाची युती हि केवळ आगामी निवडणुकांतील अॅडजस्टमेंट आहे. त्यानंतर पुन्हा दोघांत धुसफूस सुरूच राहणार आहे.
- जुबेर इनामदार, काँग्रेस गटनेता