उल्हासनगर - शहर पुर्वेतील डंपिंगग्राऊंड हटविण्याची मागणी नगरसेवक सतराम जेसवानी यांच्यासह भाजपचे मंडळ अध्यक्ष अमर लुंड यांनी करून ३ सप्टेंबर पासुंन उपोषणाचा इशारा दिला. त्यांच्या उपोषणाला स्थायी समिती सभापती राजेश वाधरिया यांच्यासह अनेक नगरसेवकांनी पाठिंबा दिला असून गुरवारी होणाऱ्या महासभेत भाजपने स्थगन प्रस्ताव आणला आहे. डंपिंग वरून भाजपाशिवसेना आमने सामने आल्याचे चित्र शहरात आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरातील खडी मशीन येथे डंपिंग ग्राउंड रहिवासी भागात असून डंपिंगला दुर्गंधी पसरली असल्याचा आरोप नगरसेवक सतराम जेसवानी यांनी केला आहे. तर उन्हाळ्यात डंपिंग ग्राउंडला आग लागून परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण होते. स्थानिक नागरिकांनी व नगरसेवकांनी अनेकदा डंपिंग हटाव साठी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. तसेच महासभेत यापूर्वी नगरसेवकांनी टिय्या आंदोलन करुन डंपिंग ग्राउंड हटावची मागणी केली. डंपिंगमुळे २० हजार पेक्षा जास्त नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. डंपिंग ग्राउंड बाबत महापालिकेने निर्णय घेतला नाहीतर ३ सप्टेंबर पासून स्थानिक नागरिकां सोबत उपोषणाला बसण्याचा इशारा जेसवानी यांनी दिला. तसेच उपोषणाचे पत्र महापालिका आयुक्तांना दिले.
नगरसेवक सतराम जेसावानी यांच्यासह भाजप मंडळ अध्यक्ष अमर लुंड यांच्या उपोषणाला नगरसेवक शेरी लुंड, कांचन लुंड, मनोज लासी, गजानन शेळके, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, जमनुदास पुरस्वाणी आदींनी लेखी पाठिंबा दिला. तसेच गुरवारी २० आॅगस्ट रोजीच्या महापालिका महासभेत भाजपचे गटनेते जमनुदास पुरस्वानी यांनी स्थगन प्रस्ताव आणला आहे. डंपिंग ग्राउंड प्रकरणावरून भाजपने सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याची खेळी खेळणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापालिका शाळा अतिक्रमण व अँब्रोसिया हॉटेल जवळील पालिका भूखंडावर काढलेल्या सनद वरून सत्ताधारी शिवसेना व मित्र पक्षातील वादही सोशल मीडियावर गाजले असून सत्ताधारी पक्षातील वादाचा फायदा भाजप उठविण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांनी गेल्या आठवड्यात डंपिंग ग्राउंडच्या जागे साठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साकडे घातले. तसेच उसाटणे गाव हद्दीतील एमएमआरडीएच्या ताब्यातील ३० एकर जागेची मागणी केली आहे.
महापालिकेचा राज्य शासनाकडे पाठपुरावा
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी राज्य शासन व एमएमआरडीएकडे डंपिंग ग्राउंडच्या जागेसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर एमएमआरडीएच्या ताब्यातील उसाटणे गाव हद्दीतील ३० एकर जागा देण्याला तात्विक मंजुरी राज्य शासनाने दिल्याची माहिती तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी त्यावेळी दिली होती. याबाबत गुरवारी महासभा काय निर्णय घेते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.