भिवंडी : लोकसभा निवडणुकीतील भिवंडी मतदारसंघाचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी मित्रपक्ष शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह रिपाइं आणि श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांची फळी कामाला लागली आहे.भिवंडी मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचा सुरुवातीला विरोध होता. मात्र, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यात ही निवडणूक महायुतीने मिळून लढण्याचे ठरले. तसे शिवसैनिकांना आदेशही मिळाले. परंतु, एका गटाने बंड पुकारून अवघ्या मतदारसंघातील असंतुष्टांचे नेतृत्व केले. मात्र, वरिष्ठांच्या आदेशाचा सन्मान करत वैयक्तिक मते कायम ठेवली. या बंडाची ठिणगी विझवण्याचे प्रयत्न सध्या ठिकठिकाणी सुरू असून वैयक्तिक वादापेक्षा केंद्रात सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षातील सर्व कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले जात आहे. परिणामी, शिवसैनिकांनी भाजप उमेदवाराचे काम सुरू केले आहे. मतदारसंघातील शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी उमेदवारासह ठिकठिकाणी कार्यक्रमात सहभागी होत शिवसैनिकांना आवाहन करत आहेत.दुसरीकडे रिपाइंचे (आठवले गट) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या कार्यालयातून काम सुरू केले आहे. ग्रामीण भागातील श्रमजीवीच्या कार्यालयातून त्यांच्या कार्यकर्त्यांनी काम सुरू केले आहे. श्रमजीवींचे नेतृत्व करणारे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांनी कपिल पाटील यांना साथ दिल्याने त्यांचे कार्यकर्तेही गावपातळीवर बैठका घेत आहेत. ग्रामस्थांना ते युतीच्या उमेदवारालाच मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. प्रचारासाठी भाजपसह मित्रपक्षांच्या ठिकठिकाणी बैठका सुरू आहेत.सर्व मित्रपक्षांची एकदिलाने साथनेत्यांच्या आदेशामुळे शिवसैनिक भाजप कार्यकर्त्यांच्या हातात हात घालून प्रचार करत आहेत. शिवसैनिकांच्या मनातील नाराजी आता संपली असून युतीधर्मासाठी सर्व मित्रपक्षांचे कार्यकर्ते झटत आहेत.- कपिल पाटील, भाजपपक्षप्रमुखांचा आदेश अंतिमशिवसैनिकांसाठी पक्षप्रमुखांचा आदेश अंतिम आहे. युतीधर्मास कलंक लागेल, असे काम शिवसैनिक करणार नाहीत. पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन करत शिवसैनिक भाजपचा प्रचार करत आहेत.- प्रकाश पाटील, शिवसेना, ग्रामीण जिल्हाप्रमुखविधानसभा मतदारसंघांतील मित्रपक्षाच्या कार्यालयांत काय दिसले?१. भिवंडी पूर्व : या विधानसभा हद्दीत महायुतीच्या कार्यालयातून शिवसेना सर्व सूत्रे हलवत आहे. रिपाइं, श्रमजीवी संघटनेसोबत कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन रणनीती आखली जातेय.२. भिवंडी पश्चिम : या विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी बैठका तेथेच घेतल्या जातात. हेवेदावे विसरून शिवसैनिक प्रचारात गुंतले आहेत.३. भिवंडी ग्रामीण : महायुतीची कार्यालये पडघा व आंबाडी येथे आहेत. खारपट्टी बाजूचे कार्यकर्ते संपर्कात आहेत. ग्रामीण भागातील शिवसैनिकांनी पुढाकार घेतलेला नाही.४. कल्याण पश्चिम : एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या बैठका व मेळावे घेतले. त्यामुळे शिवसैनिक कामाला लागले आहेत. रिपाइंच्या कार्यालयातूनही काम सुरू आहे.५. शहापूर : शिवसेनेच्या गोटात अद्याप नाराजी आहे. शिवसैनिकांना राजी करण्यासाठी उमेदवार कपिल पाटील यांचे सहकारी शहापूरमध्ये तळ ठोकून आहेत.६. मुरबाड : शिवाजी चौकात शिवसेनेच्या शाखेतून काम सुरू आहे. पालकमंत्र्यांच्या सांगण्यानुसार शिवसैनिकांनी नाराजी बाजूला ठेवून भाजपचे काम सुरू केले आहे.
भाजपसाठी शिवसेना, रिपाइं, श्रमजीवीची फळी लागली कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 2:21 AM