उल्हासनगर : भाजपाच्या पूजा भोईर यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने रद्द ठरवला आहे. जात पडताळणी समितीच्या निर्णयाने त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले असून आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उल्हासनगर महापालिका प्रभाग क्रमांक - १ (ब) मधून भोईर भाजपाच्या चिन्हावर एसटी प्रवर्गातून निवडून आल्या. हिंदू महादेव कोळी जात अनुसूचित जमाती प्रवर्गात येत नसल्याचा निष्कर्ष समितीचे सदस्य एस. ए. गोवेकर, पी. व्ही. दाभाडे व एस. टी. भालेकर यांनी काढून जातीचा दाखला रद्द केला. भोईर यांचे पद धोक्यात आल्याने भाजपाला धक्का बसला आहे. महापालिका सचिव प्रतिभा कुलकर्णी यांनी पत्र आल्याचे सांगितले.दरम्यान, गेल्या महिन्यात प्रभाग क्रमांक १७ मधून राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या पूजा कौर लबाना यांचाही जातीचा दाखला अवैध ठरवल्याने नगरसेवक पद रद्द झाले. एप्रिल महिन्यात त्याजागी पोटनिवडणूक होत आहे. न्यायालय कुठला निर्णय देते याकडे भाजपाचे लक्ष लागले आहे. भाजपा कुठली भूमिका घेत हेही पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भाजपाला धक्का : पूजा भोईर यांचा जातीचा दाखला रद्द, नगरसेवकपद येणार धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 2:40 AM