मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या ऑनलाईन महासभेत सत्ताधारी भाजपाने महापालिकेतील कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे दडपण्यासाठी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी दिलेले नियम ज चे प्रस्ताव चर्चेला घेतले नाहीत असा आरोप महासभे नंतर शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे .महासभेसाठी नियम ज अन्व्ये आमदार गीता जैन यांनी १०० कोटी रुपयांच्या मोकळ्या जागांवरील कर वसुली थकबाकीचा मुद्दा घेतला होता . काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाने सार्वजनिक उत्सव, कार्यक्रम व थेट २०२२ सालच्या महापालिका निवडणुकीसाठी मंडप , खुर्च्या आदी चे १२ कोटी ७१ लाखांचे कंत्राट देण्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा प्रस्ताव दिला होता .काँग्रेस आघाडीचे नगरसेवक राजीव मेहरा यांनी मीरारोडच्या भारतरत्न इंदिरा गांधी पालिका रुग्णालयात वरच्या दोन मजल्यांच्या कामासाठी सुमारे साडे पाच कोटी रुपयांचे कंत्राट दंडिलें असून त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्या मुद्दा ज च्या प्रस्तावा खाली दिला होता .परंतु सत्ताधारी भाजपाने विरोधी पक्षांचे हे प्रस्ताव चर्चेला न घेताच ते फेटाळून लावले . त्यामुळे विरोधी पक्ष नेते प्रवीण पाटील , शिवसेना गटनेत्या नीलम ढवण , काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार , नगरसेवक अनिल सावंत , राजीव मेहरा , मर्लिन डिसा , काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत आदींनी सत्ताधारी भाजपा वर आरोप केले आहेत .महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आल्या पासून भ्रष्टाचाराने कळस गाठला असून शहराची अवस्था बिकट करून टाकली आहे . नागरिक समस्या व भ्रष्टाचाराने त्रासले असून बांधकाम विभाग , नगररचना विभाग आदी भ्रष्टाचाराचे मोठे अड्डे बनल्याचा आरोप इनामदार व सावंत यांनी केला आहे . भाजपाचे ह्या भ्रष्टाचारात संगनमत असल्याने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रकार केला जात आहे . पण ह्या विरोधात शासना कडे दाद मागणार असा इशारा सामंत यांनी दिला आहे .
भ्रष्टाचार दडपण्यासाठी भाजपाने विरोधकांचा आवाज दाबला, शिवसेना आणि काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 8:59 PM