डोंबिवली : शिवसेना टेंडरिंगमध्ये रिंगमास्टर असल्याचा आरोप भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांनी मंगळवारी केला होता. त्याची दखल घेत त्यांचा बोलवता धनी कोण आहे, हे आम्हाला माहीत आहे. भाजपाने तर २७ गावांची सुपारी घेतली आहे, असा आरोप केडीएमसीचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी बुधवारी केला.मोरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटारडे आहेत. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे दिशाभूल करणारे आहेत. पालिकेचा त्यांनी बट्ट्याबोळ केला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेच या महापालिका व जिल्ह्याला विकासाकडे नेतील. पण, त्यांना अनेक अडथळे येत आहेत. त्याला भाजपाचे येथील नेते जबाबदार आहेत. २७ गावांमध्ये विकास करण्यासाठीही आमचा कृती आराखडा तयार आहे. काहीही झाले तरी शिवसेना त्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य हे सत्यच असते, ते कधीना कधी उघडे पडतेच, हे विसरू नये. शहरांमध्ये सुरू असलेली विकासकामे केवळ शिवसेनेच्या धोरणांमुळे सुरू आहेत. साहित्य संमेलनालाही ५० लाखांचा निधी देणारी ही एकमेव महापालिका होती, हे विसरून कसे चालेल. भाजपाचे पदाधिकारी तोंडाला येईल ते बोलत आहेत. नेहमीच शिवसेनेने कमीपणाची भूमिका घेतली आहे. पण, तरीही आरोप सुरूच आहेत, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
‘भाजपाने घेतली २७ गावांची सुपारी’
By admin | Published: February 16, 2017 2:01 AM