मीरारोड - बहुमताच्या बळावर सत्ताधारी भाजपाने प्रभाग समिती निधीवर डल्ला मारत तो फक्त भाजपा नगरसेवकांच्या प्रभागात वापरण्याचे प्रस्ताव मंजूर केल्याने शिवसेना व काँग्रेस नगरसेवकांच्या हाती भोपळा दिला होता. गेल्या महिन्यातील लोकमतच्या वृत्तानंतर सेना, काँग्रेसने या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. अखेर पालिकेनेदेखील कायद्यातच प्रभाग समिती निधीच्या समान वाटपाची तरतूद असल्याचे स्पष्ट करत प्रभाग समितीचा निधी सम प्रमाणात वाटण्याचे पत्रच भाजपाच्या सर्व सहा प्रभाग समिती सभापतींना पाठवले आहे.
भाजपाने पालिकेत ६१ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवल्याने एकहाती व एकछत्री कारभार सुरु झाला आहे. प्रभाग समित्यांची रचना प्रशासनाने भौगोलिक रचनेनुसार केलेली असताना बहुमताच्या बळावर भाजपाने त्यात फेरबदल करुन काँग्रेस व सेनेच्या हाती मिळणारी प्रत्येकी एक प्रभाग समिती हिसकावून घेत या दोन्ही पक्षना झटका दिला. पालिकेतील सर्व सहाच्या सहा प्रभाग समित्या ताब्यात घेतानाच प्रभाग समिती निधी पूर्वीप्रमाणे प्रत्येक नगरसेवकास न देता नियमावर बोट ठेऊन प्रभाग समितीनिहाय निधीची तरतूद करण्याची खेळी भाजपाने केली.
सभापतींनी प्रभाग समितीनिहाय कामांचे प्रस्ताव आणताना सेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांचे प्रस्तावच घेतले नाही. आणि बहुमताच्या बळावर केवळ भाजपा नगरसेवकांची कामेच मंजूर करुन घेतली. आधीच सेना व काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागांमधील कामे डावलली जात असताना आधीच्या निधीतील कामेसुध्दा झालेली नाहीत. त्यातच चालू वर्षातील प्रभाग समिती निधीमध्ये देखील भाजपाने वाटमारी केल्याने सेना व काँग्रेसचे नगरसेवक हवालदिल झाले होते.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांच्यापासून थेट मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागा पर्यंत या प्रकारा बद्दल तक्रार केली होती. सेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनीसुध्दा आयुक्तांची या प्रकरणी भेट घेतली होती. त्यातच कहर म्हणजे आयुक्तांनीच महापौर दालनात बसलेल्या आमदार मेहतांना भेटा, असा सल्ला सेना नगरसेवकांना दिल्याने आमदार सरनाईक व सेना नगरसेवक संतापल्याची चर्चा चांगलीच रंगली.
अखेर आयुक्तांनीच नियमातील तरतुदीनुसार प्रभाग समिती निधी प्रत्येक प्रभागातील कामांसाठी सम प्रमाणात देण्याची भूमिका घेतली. त्यासाठी नियमातील तरतूद स्पष्ट करणारे व निधी सम प्रमाणात कामांसाठी वापरण्याचे पत्रच भाजपाच्या सर्व सभापतींना कार्यकारी अभियंता दिपक खांबित यांनी दिले आहे. या मुळे प्रभाग समिती एकट्याने लाटण्याच्या भाजपाच्या मनसुब्यांना आयुक्त व प्रशासनाने धक्का दिला आहे.