ठाणे: पालघर पोटनिवडणुकीत चिंतामण वनगा यांच्या मुलाला उमेदवारी देऊन कुरघोडी करणाऱ्या शिवसेनेवर भाजपा आता नारायणास्त्र सोडणार आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे ही निवडणूक रंगतदार झाली आहे. त्यामुळे आगामी प्रचारात दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आगपाखड करणार, यात कोणतीही शंका नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात शिवसेनेविरोधात मुलुखमैदानी तोफ वापरायचे ठरवले आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खासदार नारायण राणे यांना प्रचारात उतरण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे राणे यांनीही मुख्यमंत्र्यांची ही विनंती मान्य केली आहे.त्यामुळे पालघर पोटनिवडणुकीच्या आगामी प्रचारात शिवसेना विरुद्ध नारायण राणे अशा कट्टर हाडवैऱ्यांचा सामना रंगताना दिसेल.भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. वनगा यांच्या कुटुंबानं गेल्याच आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्याने भाजपासमोरील अडचणी वाढल्या होत्या. मात्र, भाजपाने ऐनवेळी काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांना गळाला लावत शिवसेनेपुढे आव्हान निर्माण केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यावरून जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
भाजपाचे 'नारायणास्त्र'; पालघरच्या मैदानात रंगणार राणे vs शिवसेना सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 2:02 PM