मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक उद्या बुधवार २४ फेब्रुवारी रोजी होत असून भाजपा कडून तब्बल राकेश शाह, दिनेश जैन व सुरेश खंडेलवाल या तीन इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर शिवसेनेच्या वतीने कमलेश भोईर यांनी अर्ज भरला आहे. भाजपात माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक व विरोधक असे दोन गट पडल्याने पालिका तिजोरीच्या चाव्या कोणत्या गटाच्या हाती राहणार याची चुरस निर्माण झाली आहे.
महानगरपालिकेत भाजप पक्षाची एक हाती सत्ता आहे. स्थायी समिती मध्ये भाजपाचे १० , शिवसेनेचे ४ व काँग्रेसचे २ असे सदस्य संख्या बळ आहे. परंतु भाजपात मेहता विरोधात अनेक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उभे ठाकले असून वादग्रस्त मेहतां मुळे पक्ष बदनाम झाल्याने मेहता हटाव भाजपा बचाव असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. दुसरी कडे मेहता व समर्थकांनी देखील आपली ताकद दाखवण्यासाठी मोर्चेबांधणी चालवली आहे.
त्यातूनच स्थायी समिती सभापती पदाचा आज मंगळवारी उमेदवारी अर्ज भरताना मेहता समर्थक दिनेश जैन यांनी तर मेहता विरोधी मानले जाणारे सुरेश खंडेलवाल यांनी भाजपाचे उमेदवार म्हणून अर्ज भरला. शिवाय भाजपाचे राकेश शाह यांनी सुद्धा खंडेलवाल व वैशाली रकवी यांच्या सूचक - अनुमोदनाने अर्ज दाखल केला आहे. तर शिवसेनेकडून कमलेश भोईर यांनी अर्ज दाखल केला आहे.
भाजपा गटनेते तथा उपमहापौर व स्थायी समिती सदस्य असेलेले हसमुख गेहलोत मेहता समर्थक मानले जात असल्याने ते दिनेश जैन यांच्या बाजूने पक्षादेश जारी करण्याची शक्यता आहे. तर भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे व मेहता विरोधक मात्र राकेश शाह यांच्यासाठी मोर्चेबांधणी करण्याची शक्यता आहे.