ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीत ठाणे, तसेच पालघर जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा जागांपैकी नऊ जागांवर भाजपला मागील निवडणुकीत यश प्राप्त झाले. यावेळी किमान १२ जागांची भाजपची मागणी आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये मागील विधानसभा निवडणुकीत यश मिळाले नसले तरी लोकसभा निवडणुकीत भाजपचा खासदार विजयी झाला. साहजिकच पालघरमध्येही जागा मिळविण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील केवळ नऊ जागांवर समाधान न मानता जास्तीत जास्त जागा कशा पदरात पाडून घेतल्या जाऊ शकतात, याची चाचपणी भाजपकडून सुरू झाली.
ज्येष्ठ नागरिकांच्या मतांवर देणार भर
विधानसभानिहाय किती ज्येष्ठ मतदार आहेत, ते हेरून त्यांचे मतदान करवून घेण्यावर भर दिला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन मतदान करून घेण्याबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
अमित शाह ठाणे-पालघरला देणार भेटकेंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ठाणे व पालघर जिल्ह्यांना भेट देण्याचे निश्चित केले आहे. विधानसभा निवडणुकीत ठाण्यात बाजी मारायचीच, असा चंग शहा यांनी बांधला आहे.
जागांची तीन गटांत वर्गवारी यावेळी महायुतीमध्ये अधिकाधिक जागा आपल्याकडे खेचून घेण्याकरिता भाजपने सर्व विधानसभा जागांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ अशी तीन गटांत वर्गवारी केली. ‘अ’ श्रेणीच्या जागांवर भाजपचा दावा आहे. ‘ब’ श्रेणीतील जागांवर भाजपचे मतदान वाढवण्याकरिता प्रयत्न राहणार आहे, तर ‘क’ श्रेणीतील जागांच्या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढवण्यावर भर देण्यासाठी विधानसभानिहाय बैठकांचे सत्र सुरू आहे. या बैठकांना जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष आणि महिला आघाडीच्या अध्यक्ष उपस्थित राहतात.