ठाणे : मुंबई, ठाणे महापालिकांच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव असून गेल्या काही वर्षांत दोन्ही महापालिकांमध्ये झालेल्या आर्थिक निर्णयांचा एसआयटी नेमून चौकशी करण्यास शिवसेनेने तयारी दाखवली, तरच युती करण्याची अट भाजपाने पुढे ठेवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शक कारभाराचे केलेले वक्तव्य हे त्याच चौकशीचे सूतोवाच असल्याचे मानले जात आहे.त्याचबरोबर जागावाटपात पालिकेतील निम्म्या जागांवरही दावा केला जाणार आहे. मुंबईतील स्थायी समितीत सिंडिकेट, तर ठाणे पालिकेतील स्थायी समितीत गोल्डन गँग कार्यरत आहे. वर्षानुवर्षे या महापालिकांत सत्तेवर असताना शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून रस्ते, मलनि:सारण व्यवस्था, कचरा विल्हेवाट, औषधखरेदी आदी कामांत भ्रष्टाचार केल्याचे आरोप झाले आहेत. मुंबई महापालिकेतील काही कंत्राटदारांना तर घोटाळ्यांकरिता अटक झाली आहे. ठाण्यात बिल्डर सुरज परमार यांनी त्यांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांनी आपल्या डायरीत काही नेत्यांवर आरोप केले. या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याकरिता भाजपाला एसआयटी चौकशी हवी आहे. एसआयटी स्थापन करण्यास शिवसेनेने अनुमती दिली, तर महापालिकांमधील भ्रष्टाचारामुळे तयार झालेल्या अॅण्टी इन्कम्बन्सीचा फटका आपल्याला बसणार नाही, असा भाजपाचा होरा आहे. यापुढे सत्तेकरिता नव्हे तर पारदर्शकतेकरिता युती होईल, हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान त्या एसआयटी चौकशीच्या प्रस्तावाचे अप्रत्यक्ष सूतोवाच असल्याचे मानले जात आहे. (प्रतिनिधी)भाजपाची ही रणनीतीसत्तेतील मोठा भाऊ असताना आपण युती तोडली, हा संदेश भाजपाला जाऊ द्यायचा नाही. कारण, युतीच्या वाटाघाटी सुरू असल्याचा देखावा केला, तर भाजपामधील बंडखोरी रोखणे शक्य होईल. शिवसेना ही मागणी मान्य करणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे. मात्र, यदाकदाचित शिवसेनेने सत्ता जाऊ नये, याकरिता निम्म्या जागांची मागणी मान्य केली तर मुंबई, ठाणे महापालिकांच्या कारभाराची एसआयटी चौकशी करण्याची मागणी भाजपाने केली आहे.ही मागणी मान्य करणे, याचा अर्थ गैरव्यवहाराची अप्रत्यक्ष कबुली देणे असल्याने शिवसेना या अटीला विरोध करील व स्वत:च युती नको, असे जाहीर करील, असा भाजपा नेत्यांचा होरा आहे.जिल्हा कार्यकारिणीने दिला पुन्हा स्वबळाचा नाराठाणे : एकीकडे मुंबई, ठाण्यासाठीचा युतीचा निर्णय घेण्याची तयारी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी केली असताना दुसरीकडे मात्र गुरुवारी झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपाच्या ठाणे जिल्हा कार्यकारिणीने अप्रत्यक्षरीत्या स्वबळावर लढण्याचा नारा दिला. त्यामुळेच महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढायचे की, युती करून लढायचे, याचा निर्णय जिल्हाध्यक्षांनीच घ्यावा, असे सूतोवाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. त्यानुसार, यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून तो प्रदेशकडे सादर करून त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असेही जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत निश्चित झाल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली. भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक गुरुवारी ठाण्यात आयोजिली होती. या वेळी सुरुवातीच्या पहिल्या सत्रात जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कपिल पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीच्या वेळेस नोटाबंदीसह जे काही निर्णय मधल्या काळात भाजपा सरकारने घेतले, त्यावर सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर, महापालिका निवडणुकीत युती करायची की नाही, यावरदेखील या वेळी चर्चा झाल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, बुधवारीच मुंबई आणि ठाण्याच्या युतीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी भाजपाच्या श्रेष्ठींनी दाखवली होती. परंतु, गुरुवारी ठाण्यात अचानक श्रेष्ठींनी पुन्हा हा चेंडू जिल्हाध्यक्षांवर सोडला आहे. युती करायची झाली तर जागावाटप कशा पद्धतीने असावे, युती न झाल्यास स्वबळावर लढण्यासाठी आपली तयारी आहे का? आदींसह विविध विषयांवर या वेळी गहन चर्चा झाल्याचेही बोलले जात आहे. त्यानंतर, शिवसेनेशी युतीबाबत जो काही निर्णय होईल, त्याचा प्रस्ताव तयार करून तो प्रदेश नेत्यांकडे देण्यात यावा आणि त्यानंतर तो विचारात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही या वेळी दानवेंनी सांगितल्याचे भाजपाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)ठाण्यात नंबर वनच्या बेटकुळ्या पहिल्या सत्रात भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षरीत्या स्वबळाचा नारा दिला. आगामी निवडणुकीत आम्हाला संधी दिली आणि मोकळेपणाने लढाई करण्याचा मोका दिला, तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असे सूतोवाच त्यांनी केले. श्रेष्ठींकडून ताकद मिळाली तर ठाण्यातही नंबर वन होऊन दाखवू, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
भाजपाला हवी एसआयटी चौकशी
By admin | Published: January 13, 2017 7:05 AM