ठाणे : ठाणे लोकसभेचा तिडा अद्यापही सुटु शकलेला नाही. परंतु आधी वरीष्ठ नेत्यांनी लावून धरलेली ठाणे लोकसभेची मागणी आता उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली तेव्हा भाजपची स्थानिक मंडळी पदाधिकारी वरीष्ठ नेत्यांकडे करु लागले आहेत. दोन दिवस झालेल्या भाजपच्या वरीष्ठ नेत्यांच्या मॅरेथॉन बैठकीत ही मागणी लावून धरण्यात आली आहे. त्यातही ठाणे लोकसभा भाजपकडे का असावी याचे दाखले देखील देण्यात आले आहेत. परंतु उमेदवार कोणीही असला तरी देखील आपल्याला युतीसाठी काम करायचे असल्याचे वरीष्ठांनी सांगत भाजपच्या स्थानिक मंडळींची घोर निराशाच केल्याचे दिसत आहे.
ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा दर्शविली आहे. रविवारी भाजपच्या कार्यालयात मेरा बुथ सब से मजबुत अंतर्गत बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रदेश प्रभारी दिनेश शर्मा यांनी हजेरी लावली होती. यावेळी भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना ठाणे लोकसभा लढविण्याचा हट्टच धरला. त्यानंतर सोमवारी सकाळी ७.३० वाजता बुथ लेव्हलच्या पदाधिकारी, माजी नगरेसवक व इतर पदाधिकाºयांची बैठक रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थित झाली. या बैठकीत देखील ठाणे लोकसभा भाजपने लढावी अशी मागणी लावून धरण्यात आल्याची माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली. तसेच यावेळी ठाणे लोकसभा भाजपला का हवी यासाठी इतिहासाचे दाखले देखील यावेळी चव्हाण यांच्या समोर मांडण्यात आले.
मैत्रीत ठाणे आणि पालघर लोकसभा हा शिंदे सेनेकडे गेला आहे. परंतु जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून हा मतदार संघ भाजपला मिळावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. परंतु सुरवातीला स्थानिक वरीष्ठ पातळीवरील काही नेत्यांनी ही मागणी केली होती. त्यावेळेस त्यांच्या स्थानिक पदाधिकाºयांनी त्याला साथ दिली नसल्याचे दिसून आले होते. परंतु आता मागील दोन दिवसापासून स्थानिक पदाधिकारी देखील ठाणे लोकसभेचा हट्ट करतांना दिसत आहेत. याचा अर्थ असा होतो की उद्या ही जागा शिंदे सेनेला गेली तर आम्ही मागणी केली होती, असा सुर लावायला ही मंडळी मोकळी होतील अशी देखील चर्चा आता भाजपचे स्थानिक पातळीवरील वरीष्ठ नेते करीत आहेत. सुरवातीपासूनच ही मागणी लावून धरली असती तर ही जागा भाजपला मिळणे सोपे झाले असते. परंतु आता वरीष्ठ नेतेच उमेदवार कोणी असला तरी आपल्याला महायुतीसाठी काम करायचे आहे, त्या दृष्टीने तयार रहा अशी सुचना करीत आहेत. त्यामुळे याचा अर्थ काय समजायचा असा प्रश्न स्थानिक नेत्यांना सतावू लागला आहे.