महाराष्ट्र, बिहार राज्यातून भाजपा हद्दपार होणार - विजय वडेट्टीवार
By अजित मांडके | Published: March 15, 2024 02:19 PM2024-03-15T14:19:37+5:302024-03-15T14:50:30+5:30
पक्ष फोडून नेते पळून ज्यांनी या राज्याच्या अस्मितेला डाग लावला त्यांच्या उरात या यात्रेने धडकी भरली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ठाणे : महाराष्ट्र, बिहार या राज्यातून भाजप हद्दपार होणार असून कर्नाटक ही त्यांच्याकडे राहणार नसल्याचे भाकीत काँग्रेस पक्षाचे नेते व विधान सभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी ठाण्यात बोलताना वर्तवले आहे. तर अब की बार ४०० पार म्हणणारे भाजप सरकार आले तर डिझेल आणि पेट्रोलचे दर हे निश्चित ४० पार होतील अशी टीका ही त्यांनी यावेळी केली. याशिवाय महाराष्ट्रातच नाही तर देशात ही चित्र बदलत असल्याचेही त्यांनी यावेळी प्रामुख्याने सांगितले.
शनिवारी १६ मार्च रोजी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाणे शहरातून मुंबईकडे रवाना होणार आहे. या यात्रेनिमित्त ही यात्रा यशस्वी व्हावी, यासाठी शुक्रवारी विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार हे काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांच्यासह ठाण्यात आले होते.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वरील भाकीत केले. आता जे दिसत आहे त्यात बदलाचे वारे दिसत आहे. याच दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला राहिलेला नाही. बदनामी करून बळकवलेले किल्ले हे साफ होणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. पक्ष फोडून नेते पळून ज्यांनी या राज्याच्या अस्मितेला डाग लावला त्यांच्या उरात या यात्रेने धडकी भरली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर भाजप सत्तेपासून दूर आहे. त्यामुळे त्यांना जागा कुठून मिळणार असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
राहुल गांधींची मुंबईत होणार सभा
दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेची मुंबईत सांगता होत असताना, त्या निमित्ताने मुंबईत शिवाजी पार्क येथे होणारी सभा ही जोरातच होईल. या सभेला इंडिया आघाडीमधील १५ मित्र पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये तेजस्वी यादव, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, शरद पवार आदी उपस्थित राहणार आहेत. ही यात्रा यशस्वी होणार आणि देशात बदल निश्चितच होणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.