कल्याण : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येत्या निवडणुकीत भाजपला आपली जागा समजून येईल, असा इशारा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी भाजपला दिला. पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर सोपवली तर त्यास आपण चांगल्या प्रकारे न्याय देऊ, असेही ते म्हणाले. पटोले हे गुरुवारी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. काँग्रेस कमिटीचे सचिव संजय दत्त यांच्या घरी पटोले यांनी सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.‘खोटं बोला; पण रेटून बोला’, अशी भाजपची भूमिका असून, भाजप कसा खोटारडा आहे, हे आता जनतेला कळू लागले आहे. भाजपने जनतेच्या मनातील कौल ओळखला पाहिजे. जनतेच्या मनात काय सुरू आहे, हे ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून त्यांना समजत नसेल तर त्याला काही अर्थ नाही, अशी टीका पटोले यांनी केली. दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदाबाबत विचारणा केली असता पक्ष जो आदेश देईल त्याचे पालन करणे ही आपली जबाबदारी असून, त्याला आपण चांगल्या प्रकारे न्याय देऊ, असे ते म्हणाले.आगामी केडीएमसी निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढायचे किंवा वेगवेगळे, याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नसल्याचेही पटोले यांनी सांगितले. कल्याण जिल्हा काँग्रेसतर्फे पटोले यांचे जंगी स्वागत करण्यात आले. युवक काँग्रेस उपाध्यक्ष ब्रिज दत्त, काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश प्रतिनिधी मुन्ना तिवारी, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पालिका निवडणुकीत भाजपला जागा कळेल, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 5:54 AM