भिवंडी : आगामी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपचे विधानसभेत १५२ आमदार तर लोकसभेत ४५ हुन अधिक खासदार निवडून येतील असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी भिवंडीत भाजपचे एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन गुरुवारी अंजुर येथील एका रिसॉर्ट मध्ये करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना बावनकुळे बोलत होते. भाजपच्या वाट्याला विधानसभेच्या जेवढ्या जागा येथील तिक्तही ८० टक्क्यांहून अधिक जागा भाजपा जिंकेल असा विश्वास देखील यावेळी बावनकुळे यांनी व्यक्त केला.
भिवंडीत आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरात भाजपच्या ५६० पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यांनतर विभागवार प्रशिक्षण सुरूच राहणार असून सुमारे १ लाख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महायुतीच्या कार्याचा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळातील विकास कामांची माहिती घरोघरी पोहविण्यात येणार असून यासाठी २८८ पूर्ण वेळ विस्तारक काम करणार असून या सर्व कामांचे भाजपा सूक्ष्म ऑडिट करणार आहे.आणि या सर्व नियोजनाच्या माध्यमातून भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या महायुतीच्या विधानसभेत २०० हुन अधिक तर लोकसभेत ४५ हुन अधिक जागा निवडून आणण्यासाठी योजना आज या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून करण्यात आली आहे अशी माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली.या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न असून या माध्यमातून भाजप संसदेपासून ते पंचायत पर्यंत नंबर एकचा पक्ष राहील असे मत देखील बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केले.
राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पत्रकारांनी विचारले असता याबाबतचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे वरिष्ठ नेते घेतील अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी यावेळी दिली असून राज्यात सत्तेत असलेल्या भाजप शिवसेना व राष्ट्रवादी या तीनही पक्षांमध्ये चांगले समन्वय असल्याचेही बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले असून तीनही पक्षांचे चार चार चार अशा बारा जणांची समन्वय समिती प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली गठीत करण्यात आली असल्याचेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. या प्रशिक्षण शिबिरात केंद्रीय पंचायतीराज राज्य मंत्री कपिल पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे,डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार यांच्यासह राज्यातील मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण,डॉ.सुरेश खाडे,मंगलप्रभात लोढा,माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासह भाजपचे राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.