ठाणे :
येत्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०० हून अधिक जागा जिंकण्याचे आमचे ध्येय आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. संघटनात्मक दौऱ्यानिमित्ताने बावनकुळे हे शनिवारी ठाण्यात आले होते, तेव्हा त्यांनी सहयोग मंदिर येथे पत्रकारांशी संवाद साधला.
भारतीय जनता पक्ष हा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. पण आम्हाला राज्यात पक्षाची ताकद ५१ टक्के इतकी वाढवायची आहे. प्रत्येक बूथवर १८ वर्षांवरील किमान नऊ मतदाराची नोंद करणे, महाविकास आघाडीच्या पंचवीस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश व्हावा, असे लक्ष्य कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. यापूर्वीचे मुख्यमंत्री अडीच वर्षांपैकी १८ महिने मंत्रालयात गेले नाहीत, असा टोला बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. राज्यात मागील अडीच वर्षे पोषक वातावरण नव्हते.
आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०० हून अधिक जागा जिंकण्याचे. तर लोकसभा निवडणुकीत ४५ जागा जिंकण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले. सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचवू. आपल्या या दौऱ्याच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या समस्या आपण सरकारपर्यंत पोहोचवू, असेही बावनकुळे म्हणाले.
पवार-शिंदे भेट राजकीय नाहीशरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेली भेट ही वेगळ्या कारणासाठी असेल. पण काही जण मुद्दाम त्या भेटीची वेगळी चर्चा करतात, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेल्या विश्वासघाताचा वचपा यापूर्वी शिंदे यांनी काढल्याचे ते म्हणाले.
भारत जोडो यात्रेत काँग्रेस फुटतेयराहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कार्यकर्त्यांनी नव्हे तर नेत्यांनी हायजॅक केली आहे, असा टोला बावनकुळे यांनी लगावला. गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात येत असताना येथील काँग्रेसचे नेते भाजपात प्रवेश करत आहेत. येत्या काही दिवसांत मोठे नेते प्रवेश करतील. या यात्रेत पक्ष वाढत नसून फुटतो आहे, अशी खिल्ली बावनकुळे यांनी उडवली.