ठाणे : गुरुवारी भाजपने शहरभर बॅनर लावून शिवसेनेला ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी केव्हा? असा सवाल केला होता. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या महासभेतदेखील ‘क्या हुआ तेरा वादा’ म्हणत भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. ठाणेकरांना करमाफी द्यावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. तर काँग्रेसने किमान झोपडपट्टी भागात राहणाऱ्या तसेच दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना किमान तीन महिन्यांचा मालमत्ताकर माफ करावा, अशी मागणी केली. मात्र, यावरून सत्ताधारी शिवसेना निरुत्तर झालेली दिसली.गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने २०१७ मध्ये झालेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी दिली जाईल, असे वचन दिले होते. त्याचीच आठवण भाजप आणि मनसेकडून करून दिली जातआहे.गुरुवारी याच मुद्द्यावरून मनसेने आंदोलन केले होते. तर भाजपने शहरभर बॅनर लावून शिवसेनेला या वचनाची आठवण करून दिलीहोती.त्यानंतर शुक्रवारी झालेल्या महासभेत भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे, मिलिंद पाटणकर, भरत चव्हाण यांच्यासह इतर नगरसेवकांनी सत्ताधारी शिवसेनेला या मुद्द्यावरून चांगलेच घेरले. परंतु, यावर शिवसेनेकडून काहीच उत्तर मिळाले नाही.शिवसेना नगरसेविकांचा काँग्रेसला पाठिंबादुसरीकडे निवडणुकीत शिवसेनेने काय वचन दिले होते, ते आम्हाला माहीत नाही. मात्र, कोरोनामुळे अनेकांचे हाल झालेले आहेत, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत, नोकºया गेल्या, पगार कमी झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित विस्कटलेले आहे. त्यामुळे झोपडपट्टी भागात राहणाºया किंवा दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना तीन महिन्यांसाठी मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केली. याला पाठिंबा देऊन तीन महिने नाही, तर पाच महिन्यांचा मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका विमल भोईर आणि मालती पाटील यांनी केली. परंतु, यावर योग्य असे उत्तर न मिळाल्याने मध्येच हा विषय थांबला गेला.
घरांच्या करमाफीवरून भाजपची आक्रमक भूमिका; महासभेत शिवसेनेला घेरले, सत्ताधारी निरुत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 3:59 AM