लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : भार्इंदरपाडा येथील खाजगी विकसकाला खेळाचे मैदान आंदण देणे, खाडीचे पाणी शुद्ध करुन ठेकेदाराकडून विकत घेणे, गडकरी रंगायतनवर छत टाकणे, महाराष्ट्र बोर्डचे सुरक्षारक्षक आदींसह काही केलेल्या कामांचे वादग्रस्त प्रस्तावांसह तब्बल ३९२ प्रस्ताव अवघ्या अर्धा तासात सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाशी मिलिभगत करुन मंजूर केल्याने आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. मागील २५ वर्षे सत्तेत सहकारी असलेल्या भाजपानेच आता या विरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून महापालिकेत पारदर्शक कारभाराची मागणी केली आहे. तसेच सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात भाजपाने एल्गार पुकारला असून मंगळवारी पालिका मुख्यालयाच्या आवारात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी झालेल्या महासभेत अनेक वादग्रस्त विषयांना अवघ्या अर्ध्या तासात मंजुरी देण्यात आली. शहरातील भार्इंदरपाडा येथील खेळाचे मैदान हे खाजगी विकासकाला निगा, देखभालीच्या नावाखाली देण्याच्या प्रस्तावावरुन मागील काही दिवस चांगलेच रान पेटले आहे, तसेच शहरातील प्रदूषित असलेल्या खाडीचे पाणी शुद्ध करुन त्याच पाण्यासाठी कोट्यवधींची उधळपट्टी करणे, गडकरी रंगायतन, काही झालेले रस्ते आदींसह इतरही काही वादग्रस्त आणि तब्बल ४५० कोटींचे प्रस्तावांना शनिवारच्या महासभेत कोणत्याही चर्चेशिवाय मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे यातील काही महत्त्वांच्या विषयांवर सत्ताधारी पक्षातील काही तज्ज्ञ नगरसेवकांनी चर्चा करायची होती. परंतु, ती करुन देण्यात आली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या काही नगरसेवकांनीदेखील सभात्याग केला. एकूणच आता अशा पद्धतीने ठाणेकरांच्या कररुपी पैशाची उधळपट्टी करणाऱ्या, सत्ताधारी आणि प्रशासनाच्या या मिलीभगतच्या विरोधात मागील २५ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपानेच आसूड ओढण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात भाजपाने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून, या मिलिभगतच्या विरोधात मंगळवारी महापालिका मुख्यालयाच्या आवारात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी दिली.
त्या वादग्रस्त प्रस्तावांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन
By admin | Published: May 23, 2017 1:52 AM