- अजित मांडके, ठाणेविधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानुसार जागावाटप करण्याची भाजपाची मागणी मान्य करायची झाली, तर शिवसेनेला ठाण्यात भाजपाला १३१ पैकी ६७ जागा सोडाव्या लागतीत, असे त्या पक्षाच्या नेत्यांचे मत आहे. मात्र, शिवसेनेच्या नेत्यांना हा दावा मान्य नसून मागील महापालिका निवडणुकीनुसार जागावाटप करायचे झाले, तर भाजपाला त्यांच्या विद्यमान नगरसेवकांखेरीज दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या वॉर्डांत संधी दिली जाऊ शकते, असे शिवसेनेचे मत आहे.विधानसभा निवडणुकीत तब्बल २९ वर्षांनंतर भाजपाने ठाणे शहर हा विधानसभा मतदारसंघ काबीज केला. त्यामुळे भाजपाला येथे असलेल्या १९ जागांपैकी निम्म्या जागा हव्या आहेत. कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा या मतदारसंघांत विधानसभेत भाजपाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. कळवा-मुंब्रा या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील जागावाटपही निम्मेनिम्मे व्हावे, अशी भाजपाची मागणी आहे. दिव्यातील ११ जागांमध्ये वाटप न करता त्या सर्वच्या सर्व लढवण्याची भाजपाची इच्छा आहे. भाजपाची एकूण जागांची मागणी ६७ ते ६८ जागांपर्यंत जाते. मागील वेळी भाजपाने शिवसेनेकडे २४ जागांची मागणी केली होती. प्र्रत्यक्षात २२ जागांवर निवडणूक लढवली होती व त्यांचे केवळ आठ नगरसेवक विजयी झाले होते.विधानसभेचा ठाणे शहर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात शिवसेनेचे तब्बल १७ नगरसेवक आहेत, तर भाजपाचे केवळ ३ नगरसेवक आहेत. त्यामुळे विधानसभेला भाजपा शिवसेनेचा हा गड सर करूशकत नाही, अशी चर्चा होती. परंतु, केवळ तीन नगरसेवकांच्या जोरावर भाजपाने हा गड सर करून दाखवला. नौपाड्यात संजय वाघुले, सुहासिनी लोखंडे आणि मिलिंद पाटणकर हे तिघे भाजपाचे नगरसेवक आहेत. परंतु, येथील नगरसेवकांच्या निम्म्याहून अधिक प्रभागांत भाजपाला क्रमांक एकची मते मिळाली आहेत. आता त्याच आधारे येथून निम्म्या जागांची मागणी भाजपा करीत आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघाचा विचार केल्यास येथून विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार संजय पांडे यांना ५७ हजार ६६५ मते मिळाली होती. नवखा चेहरा असतानाही पांडे यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांना १८ व्या फेरीपर्यंत घाम फोडला होता. येथील २४ नगरसेवकांपैकी शिवसेनेचे १५, मनसेचे दोन, तीन अपक्ष, राष्ट्रवादी दोन आणि एका जागेवर काँग्रेसने विजय मिळवला होता. या मतदारसंघातही विधानसभेला भाजपाने ५० हजारांहून अधिकची मते मिळवली असल्याने आता त्यांच्यासाठी या पट्ट्यातील वातावरण पोषक असल्याचा त्या पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे. त्यामुळे या भागातही ते शिवसेनेकडे १२ जागा मागत आहेत. कळवा-मुंब्रा मतदारसंघात विधानसभेला भाजपाला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. या भागात भाजपाचा एकही नगरसेवक नाही. परंतु, येथेही त्यांना निम्म्या जागांचीच अपेक्षा आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपरी -पाचपाखाडी मतदारसंघातही भाजपाने विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. भाजपाचे संदीप लेले यांना ४८ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. त्यामुळे आता येथेही भाजपाने समसमान मागणी रेटली आहे. सध्या कोपरी-पाचपाखाडीमध्ये भाजपाचे फारसे नगरसेवक नसले, तरीदेखील आता भरत चव्हाण, विलास कांबळे यांनी भाजपाचा रस्ता धरल्याने भाजपाने हा आग्रह धरला आहे. शिवसेनेला विधानसभेनुसार जागावाटप नकोच१भाजपाचे जागावाटपाचे दावे शिवसेनेला बिलकुल मान्य नाहीत. मागील निवडणुकीत भाजपाने जिंकलेल्या व त्यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या जागा असल्यास त्याच त्यांना सोडण्याबाबत चर्चा होऊ शकते. विधानसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघातून संजय केळकर निवडून आले. मात्र, त्यांचे या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालेले असल्याने तेथे शिवसेनेला लाभ मिळेल, असे त्या पक्षाच्या नेत्यांचे मत आहे.२केळकर हे नेतृत्व करण्यात अपुरे पडत असल्यानेच खा. कपिल पाटील व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना त्यांच्या मदतीला धाडले आहे. भाजपाच्या ठाण्यातील नेत्यांचे एकमेकांशी जमत नाही. कपिल पाटील त्यांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचे घोडे पुढे दामटत असल्याने भाजपात नाराजी आहे. अशा विस्कळीत व नेतृत्वहीन पक्षाने निम्म्या जागांची मागणी करणे हास्यास्पद असल्याचे मत शिवसेनेच्या एका नेत्याने व्यक्त केले.
भाजपाची ६७ जागांची मागणी
By admin | Published: January 15, 2017 5:18 AM