नवी मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांचा भाजपा प्रवेश अखेर 9 सप्टेंबरला पार पडणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गणेश नाईकभाजपाचा झेंडा हाती घेणार आहेत. मात्र तत्पूर्वी नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता धोक्यात आली आहे.
गणेश नाईक यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे 55 नगरसेवक आणि अपक्ष 2 नगरसेवक असा एक वेगळा गट आज कोकण भवन कार्यालयात जाऊन नोंदणी करणार आहे. नवी मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी 56 नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे नाईक समर्थक नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता संपुष्टात येईल आणि नवी मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल.
काही दिवसांपूर्वी संदीप नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा देत माजी महापौर सागर नाईक यांच्यासह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. पण गणेश नाईक व त्यांचे ज्येष्ठ पुत्र संजीव नाईक यांनी भाजपप्रवेशाबाबत मौन बाळगल्याने कार्यकर्त्यांत चलबिचल सुरू झाली होती. यातच शनिवारी नेरुळ येथील कार्यकर्ता मेळाव्याला आलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे भाजपच्या वाटेवर असलेल्या संजीव नाईक यांनी सपत्नीक स्वागत केले. कार्यक्रमानंतर तासभर त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे संजीव नाईक राष्ट्रवादीतच राहणार अशा आशयाच्या चर्चेला उधाण आले; परंतु आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला होता. मागील पाच वर्षांपासूनच नाईकांनी राष्ट्रवादीला खड्ड्यांत घालण्याचे कारस्थान रचले असल्याचा थेट आरोपच त्यांनी केला. गणेश नाईक यांचा पूर्वीपासून ठाण्यासह कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर तसेच ग्रामीण भागात वरचष्मा आहे. त्यामुळे आता त्याचा फायदा त्यांना भाजपामध्ये गेल्यानंतर होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचे काम ते यानिमित्ताने करतील, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.