कल्याण : लोकसभेसाठी शिवसेना-भाजपाची युती झाली असली तरी गेली साडेचार वर्षे सातत्याने परस्परांवर दुगाण्या झाडण्यामुळे शिवसेना व भाजपा कार्यकर्त्यांची मने लागलीच जुळली नसल्याची प्रचिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आली आहे. काही जागांवर शिवसेना भाजपाचे एकमत न झाल्याने भाजपाने शिवसेनेला हुलकावणी देत राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान बांधल्याचा थेट आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या नेत्यांनी अशा प्रकारचा कुठलाही समझोता आमच्यात झाला नसल्याचा दावा केला आहे.बाजार समितीच्या १८ जागांसाठी १३२ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा मंगळवारी अंतिम दिवस होता. १३२ जणांपैकी ७७ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ५५ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. त्यांना उद्या निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी निवडणूक अधिकारी जाहीर करणार आहेत. १८ जागांपैकी केवळ दोन जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विमुक्त प्रवर्गाच्या आरक्षित असलेल्या जागेवरुन मंगल मस्के तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागेवरुन अरुण जाधव हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे १६ जागांसाठी ५५ उमेदवार रिंगणात आहेत.बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपामध्ये आज दुपारपर्यंत चर्चा सुरु होती. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत भाजपाने शिवसेनेला चर्चेत झुलवत ठेवले आणि सरते शेवटी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याचा आरोप शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केला आहे. त्यामुळे युतीची चर्चा फिस्कटली आहे. शिवसेना बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढवत आहे, असे लांडगे यांनी जाहीर केले.भाजपाचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी, शिवसेनेकडून करण्यात आलेला आरोप हा अत्यंत चुकीचा आणि बिनबुडाचा असल्याचा दावा केला. भाजपाने शिवसेनेच्या आरोपाचा इन्कार केला असला, तरी याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी भाजपाशी राष्ट्रवादीची युती झालेली नसल्याचे स्पष्ट केले. अशा प्रकारची युती झाल्यास कळवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, भाजपाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.>राष्ट्रवादीशी युती नाही -भाजपाभाजपाचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यासंदर्भात म्हणाले की, बारावेची जागा शिवसेनेने कपिल थळे यांच्यासाठी मागितली होती. अन्यथा शिवसेनेचा उमेदवार अपक्ष निवडणूक लढवणार, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र भाजपाने खडवलीची जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. चार जागा शिवसेने लढवाव्यात तर पाच जागा भाजपा लढवेल हादेखील पर्याय शिवसेनेच्या नेत्यांसमोर ठेवला होता. मात्र हा पर्याय दिल्यानंतर दुपारच्या चर्चेनंतर शिवसेनेनी भाजपाला पाठ दाखवली. शिवसेनेशी चर्चा फिस्कटली हे खरे असले तरी भाजपाने राष्ट्रवादीशी युती केल्याच्या वृत्ताचा चोरगे यांनी इन्कार केला आहे.
युतीचा ‘बाजार’ उठला?, भाजपा-राष्ट्रवादीचा समझोता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 12:37 AM