लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे/भिवंडी/अनगाव : अडीच वर्षे वेगवेगळे प्रयत्न करून, मेट्रोचे आश्वासन देऊन, यंत्रमागधारकांना पॅकेज दिल्यानंतरही पुरेसे बहुमत न मिळाल्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी एकहाती बहुमत मिळवलेला काँग्रेस पक्ष फोडून सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे समजते. त्यासाठी कोणार्क विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली भिवंडी शहर विकास आघाडी स्थापन करून त्याखाली सत्तेसाठी आसुसलेल्या सर्व पक्षांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे झाले, तर खासदार कपिल पाटील यांच्या पुतण्याला महापौर करण्याचा मार्ग मोकळा होईल.भिवंडीत ९० पैकी ४७ जागा जिंकून काँग्रेसने विरोधकांना धूळ चारली. मतदारांनी खास करून मुस्लिम मतदारांनी पक्षावर मोठा विश्वास टाकल्याचे निकालानंतर दिसून आले. भाजपा- कोणार्क आघाडीच्या युतीला २३ जागांवर समाधान मानावे लागले. त्यात भाजपाच्या जागा दुपटीहून अधिक वाढल्या असल्या, तरी कोणार्कच्या जागा दोनने घटल्या. या २३ जागा हाताशी असताना सत्ता स्थापन करण्यासाठी ४६ जागांच्या बहुमताची मॅजिक फिगर गाठता येणार नसल्याने कोणार्कच्या नेतृत्त्वाखाली भिवंडी शहर विकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ही आघाडी भाजपाच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झाली, तर त्यात काँग्रेसमधील फुटीर गट सहभागी होणार नाही आणि सध्याच्या राजकारणात शिवसेनाही भाजपाप्रणित आघाडीत जाणार नाही. त्यामुळे कोणार्कला पुढे करून ही आघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना जोर चढला आहे. या आघाडीत भाजपा (१९), कोणार्क (४), ऐक्यवादी रिपब्लिकन (४), अपक्ष (२), शिवसेना (१२) सहभागी होतील; तरीही त्यांचे बळ ४१ वर पोचते. त्यांना आणखी पाच जागांची गरज लागेल. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या दोन नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर कोणी शिल्लक रहात नसल्याने काँग्रेसमधील नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या पक्षातील पाच ते सहा नगरसेवक फोडायचे, अशी रणनिती आाहे, जर शिवसेना या आघाडीत आली नाही; तर काँग्रेसमधील १७ ते १८ नगरसेवक फोडायचे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.देशभर, राज्यात आणि तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दहा पालिका, नगरपालिका निवडणुकीत भाजपाला पूरक वातावरण असतानाही भिवंडीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. पक्षाला उभारी मिळण्यासाठी या निकालाचा फायदा होईल, असे वाटत असतानाच भाजपाने कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसच्या या स्वप्नांनाच सुरूंग लावण्याचा प्रयत्न चालवला आहे. विकासासाठी आम्हालाच पैसा मिळू शकतो, असे त्या पक्षाचे नेते उघडपणे सांगत आहेत. नोंदणीपूर्वीच गट फोडणारकोकण आयुक्तांकडे काँग्रेसचा गट नोंदवला गेला, तर त्यातील दोन तृतीयांश सदस्य फोडावे लागतील. त्यामुळे तेथे या गटाची नोंदणी होण्यापूर्वीच तो पक्ष फोडणे सोपे असल्याचे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. शिवाय प्रतिकूल परिस्थितीत विजय मिळवल्यानंतर पक्षाचा एकही वरिष्ठ नेता कौतुकासाठीही भिवंडीत न फिरकल्याने काँग्रेसच्या वर्तुळात असलेल्या नाराजीचा फायदा उठवायचा अशी व्यूहरचना असल्याचे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे.काँग्रेसमधील बाहेरच्यांवर लक्षकाँग्रेसमधून निवडून आलेल्यांपैकी दोन शिवसैनिक आहेत. त्यातील एक उपशहरप्रमुख आहेत, तर एक माजी विभागप्रमुख आहेत. ते समाजवादी पक्षामार्गे वाटचाल करून सध्या काँग्रेसमध्ये आहेत. शिवाय समाजवादी पक्ष, राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये येऊन विजयी झालेल्यांना प्रामुख्याने गळाला लावण्याचा प्रय्तन सुरू आहे. त्यासाठी भाजपाचे नेते जसे काम करत आहेत, तशीच कोणार्क, अपक्ष यांच्यावरही जबाबदारी दिल्याची चर्चा आहे.हिंदूकार्ड चालवण्याचा खेळभिवंडीत निवडून आलेल्या ९० नगरसेवकांपैकी ४६ म्हणजे निम्म्याहून अधिक मुस्लिम आहेत. त्यातील ४३ काँग्रेस पक्षातच आहेत. त्यामुळे अल्पसंख्य समाजाला महापौरपद देण्याच्या हालचाली काँग्रेसने सुरू केल्या आहेत. त्या हालचालींना शह देत ऐन रमजान महिन्यात हिंदू कार्ड चालवण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर प्रदेशप्रमाणे बिगरमुस्लिम राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष१उल्हासनगरमध्ये भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याची संधी असूनही शिवसेनेने ती सोडली. आताही भाजपापेक्षा कोणार्कच्या नेतृत्त्वाखालील आघाडीत जाण्यास शिवसेना फारशी खळखळ करणार नाही, असा भाजपा नेत्यांचा होरा आहे. यापूर्वी काँग्रेससोबत शिवसेनेने सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे भिवंडीतील शिवसेना अन्य ठिकाणांपेक्षा अधिक लवचिक, अधिक धर्मनिरपेक्ष आहे, असा टोला भाजपा नेत्याने लगावला. २पण कोणार्क आघाडीत जाऊन भाजपाला बळ द्यायचे की पुन्हा काँग्रेसला मदत करायची, याबाबत शिवसेनेत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्यामुळे त्या पक्षाच्या भूमिकेवर भाजपाचे लक्ष आहे. शिवसेना जर या आघाडीत सहभागी झाली नाही, तर भाजपाप्रणित कोणार्कची भिवंडी शहर विकास आघाडी २९ वर थांबते. त्यामुळे त्यांना काँग्रेसमधून किमान १७ ते १८ नगरसेवक फोडावे लागतील. संघ, भाजपाचा विरोधकाँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतरही तो पक्ष फोडून इतर चार पक्ष, अपक्ष यांची मोट बांधून सत्ता स्थापन करण्यास भाजपातील जुन्या नेत्यांचा विरोध आहे. असे प्रयत्न केल्यास भाजपा सत्तेसेठी हपापलेली आहे, असा संदेश सर्वत्र जाईल आणि तो पक्षासाठी मारक असेल असे त्यांचे म्हणणे आहे. नवभाजपावाद्यांविरूद्ध संघ-भाजपाच्या ज्या कार्यकर्त्यांनी काम केले त्यांचाही या कल्पनेला विरोध आहे. पुतण्याला महापौर करण्यासाठी खासदार करत असलेल्या प्रत्येक कृतीमागे पक्षाने किती वाहावत जायचे, हे ठरवण्याची वेळ आल्याचे मत त्यांनी मांडले.अन्य २० नगरसेवक भाजपाच्या संपर्कातजर तीन अथवा सहा नगसेवक असलेल्यांना भिवंडीचे महापौरपद मिळत असेल, तर केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने भाजपाची संधी वाढली आहे. भाजपासोबत सध्या कोणार्क, रिपब्लिकन, अपक्ष धरून २९ नगरसेवक आहेत. आम्ही सत्ता स्थापन करावी म्हणून आणखी २० नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, असा दावा पक्षाच्या अतिवरिष्ठ नेत्याने केला. त्यामुळे काँग्रेसला ४७ जागा मिळाल्या असल्या तरी भाजपाने सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सोडलेले नाहीत, हेच यातून स्पष्ट झाले.२००१ मध्ये पालिका स्थापन झाली तेव्हा काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या २३ असताना पहिले महापौर सुरेश टावरे झाले.परंतु आपसांत ठरल्याप्रमाणे अवघ्या ६ नगरसेवकांच्या बळावर अपक्ष नगरसेवक विलास पाटील महापौर झाले. पुन्हा २००७ मध्ये ३ नगरसेवक असताना कोणार्क विकास आघाडीने महापौर पद मिळविले होते. २०१२ मध्ये काँग्रेसचे जास्त नगरसेवक असतानाही कोणार्क विकास आघाडी व शिवसेनेचे महापौर निवडून आल्याचा दाखला भाजपाचे नेते देत आहेत. या बाबत अधिक माहितीसाठी खासदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधला, पण तो होऊ शकला नाही.
काँग्रेस फोडण्याच्या भाजपाच्या हालचाली
By admin | Published: May 29, 2017 6:22 AM