ठाणे : शहरात मोठ्या प्रमाणावर खड्डे असून घोडबंदर रोडवरील उड्डाणपुलांवरील खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. याकडे लक्ष वेधत भाजपने वाघबीळनाका येथे शनिवारी जनआंदोलन करण्यात आले. ठाणे खड्डेमुक्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास भाजप चक्काजाम आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी दिला.
घोडबंदर रोडवरील वाघबीळनाका येथील उड्डाणपुलावरून जाणाऱ्या ट्रकमधील खोके पडल्यामुळे मोटारीतील एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर आणखी पाच अपघात झाले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर घोडबंदर रोडवरील उड्डाणपूल व ठाणे शहरातील खड्ड्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वाघबीळनाका येथे जनआंदोलन करण्यात आले. आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे गटनेते संजय वाघुले, प्रदेश सचिव संदीप लेले, भाजपचे घोडबंदर रोड मंडलप्रमुख हेमंत म्हात्रे यांच्यासह भाजपचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकही सहभागी झाले होते. या वेळी खड्ड्यांत वृक्षारोपणही केले.शिवसेना २५ वर्षे सत्तेत असूनही ठाण्यातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तर, एमएमआरडीए, एमएसआरडीसी यासारखे विभाग पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असतानाही ठाणे शहर खड्डेमुक्त होऊ शकले नाही, अशी टीका आमदार संजय केळकर यांनी केली. खड्ड्यांमुळे अपघातात नागरिकांचे मृत्यू होत आहेत. टाळूवरील लोणी खाणाºया सरकारला या जनआंदोलनानंतरही जाग न आल्यास आगामी काळात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दिला.