डोंबिवली : महावितरणने अव्वाच्या सव्वा वीजबिल आकारून नागरिकांना शॉक दिला आहे, हे वीजबिल तातडीने माफ करून सुधारित वीजबिल द्यावे, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार रवींद्र चव्हाण यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला.
भाजपाच्या कल्याण जिल्ह्याच्यावतीने शनिवारी महावितरणच्या बाजीप्रभू चौकातील कार्यालयासमोर निदर्शने करत वीजबिल वाढीचा निषेध केला. कोरोना महामारीमुळे नागरिक त्रस्त असताना महावितरणने सरसकट तीन महिन्यांचे बिल एकत्र करून वीजबिल दिल्याने युनिट वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे वीजबिल वाढली, परिणामी सामान्य नागरिक हैराण झाले. त्यामुळे हजारो नागरिकांनी महावितरण विरोधात तक्रारी केल्या त्याची दखल घेत पक्ष जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी निषेध आंदोलन करण्याबाबत चर्चा केल्याचे चव्हाण म्हणाले.
या वाढीव बिलामुळे सामान्य नागरिकांच्या मनात महावितरण आणि राज्य शासनाबाबत चीड, संताप व्यक्त होत असल्याचे शशिकांत कांबळे म्हणाले. 100 टक्के वीजबिल भरणा करणाऱ्या डोंबिवली शहरात देखील सातत्याने वीज खंडित होत आहे, कोरोना लॉकडाउनच्या काळात ते प्रमाण जास्त वाढले, महावितरण करते, काय असा सवाल चव्हाण यांनी केला. तरीही वारेमाप बिल आल्याने सामान्य नागरिकांनी करायचे तरी काय? असा सवाल केला.
वीज खंडित होण्याचे प्रकार थांबले नाहीत तर मात्र त्यासाठीही रस्त्यावर उतरावे लागेल असेही ते म्हणाले. आगामी आठवड्यात वीजबिल माफ करणे, वीज खंडित होण्याचे प्रमाण घटवणे झाले नाही तर भाजपच्या माध्यमातून जनजागृती करून जनआंदोलन उभे केले जाईल असेही ते म्हणाले. त्यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड उपस्थित होते. इंदिरा गांधी चौक ते बाजीप्रभू चौकापर्यंत भाजपाने घोषणा, नारेबाजी केली.
त्या आंदोलन कर्त्यांना उत्तर देताना बिक्कड म्हणाले की, भाजपाच्या मागण्याचे निवेदन मिळले असून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले असून ते जो निर्णय देतील तो कळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी भाजपाचे नगरसेवक मुकुंद पेडणेकर, शैलेश धात्रक, विनोद काळण, संदीप पुराणिक, राजन आभाळे, नंदू जोशी, सरचिटणीस राजू शेख, रवी ठाकूर, बाळा पवार, संजीव बिडवडकर, दिनेश दुबे, महिला कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
- भाजपाच्या आंदोलनादरम्यान दुपारी 2 ते अडीच वाजण्याच्या सुमारास पावसाची एक मोठी सर आली, त्यामुळे बाजीप्रभू चौकात पक्ष कार्यकर्त्यांमध्ये फिजिकल डिस्टंसिंगचा मात्र फज्जा उडाला होता. रामनगर पोलिसांनी कार्यकर्त्याना अंतर ठेवण्याचे आवाहन केले होते, अखेरीस चव्हाण यांनीही पावसात कोणी भिजू नका चारचाकी गाड्या असतील तर त्यात बसा असे आवाहन केल्यावर काही प्रमाणात गर्दी कमी झाली.