कल्याण : ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ शनिवारी कल्याणध्ये तीन ठिकाणी भाजपतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्या काही कार्यकर्त्यांनी पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिले.
दुर्गाडी चौकात भाजपने केलेल्या ‘रास्ता रोको’मध्ये भाजप खासदार कपिल पाटील, माजी आमदार व भाजप भटके विमुक्त आघाडीचे राज्य संयोजक नरेंद्र पवार, ओबीसी मोर्चाचे सचिव अनिल पंडित, प्रेमनाथ म्हात्रे, शक्तिवान भोईर, श्याम मिरकुटे, विशाल शेलार, निखिल चव्हाण, प्रिया शर्मा आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
पूर्वेतील सूचकनाका येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या ‘रास्ता रोको’मध्ये भाजप कल्याण पूर्व अध्यक्ष संजय मोरे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. टाटा नाका येथील ‘रास्ता रोको’मध्ये भाजप आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे सहभागी झाले होते.
दरम्यान, या आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने कल्याण-शीळ रस्त्यावरील दुर्गाडी, सूचकनाका आणि टाटा नाका या तिन्ही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत नंतर त्यांची सुटका केली.
------------