मीरा रोड : भाजपाच्या मीरा रोड येथील पक्ष कार्यालयात प्रेमगीतांवर शिट्या वाजवत बेधुंद नाचणे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच भोवले. भाजपाचे संपूर्ण कनकिया मंडळच बरखास्त करुन टाकले असून पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले आहेत असे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी सांगितले. पक्षातील ज्येष्ठांनीही या नाचगाण्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी सोशल मिडीयावर मीरा रोडच्या कनकिया, भैरव रेसिडन्सी मधील भाजपाच्या कनकिया मंडळ कार्यालयात प्रेमगीतांवर बेधुंद थिरकणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा व्डीडीओ व मेसेज व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. भाजपाच्या मंडळ पदाधिकारी सोनिया नायक यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सोमवारी रात्री पक्ष कार्यालयात झाला. या वेळी पक्षाचे शहरातील मोठे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. या निमित्ताने नाचगाण्यांचा कार्यक्रम ठेवला होता. पुरुष व महिला पदाधिकारी गाण्यावर बेधुंद थिरकतानाचा व्हीडीओ भाजपाच्याच पदाधिकाऱ्याने चित्रीकरण करून व्हायरल केला. त्यानंतर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठू लागली. व्हीडीओत दिसणाऱ्या भाजपा पदाधिकारी काजल सक्सेना, प्रेम फुलचंद, सोनिया नायक, राज पाठक, स्वाती भन्साली, सौजन्या तर व्हीडीओ काढणाऱ्या रजनी नागपाल यांचे राजीनामे घेतले असून संपूर्ण मंडळच बरखास्त केले आहे असे म्हात्रे म्हणाले. कनकिया मंडळ अध्यक्ष संजय थेराडे यांचा देखील राजीनामा घेतला असून घटनेचा अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे. निलंबित करण्याचा वा काढून टाकण्याचा निर्णय ते घेतील असे त्यांनी सांगितले. या पुढे पक्ष कार्यालयात वाढदिवस साजरे करण्यास बंदी घातली असून असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशाराही म्हात्रे यांनी दिला आहे. भाजपा पदाधिकारी प्रिती पाठक व नेहा कदम व्हीडीओत नसून आमच्या नावाची चर्चा चुकीची आहे असे स्वत: पाठक यांनी सांगितले. मी स्वत: पक्ष कार्यालयात नाचगाण्यास विरोध केला होता. मात्र माझे कोणीही ऐकले नाही असे पाठक म्हणाल्या. (प्रतिनिधी)
भाजपाचे मंडळ बरखास्त
By admin | Published: February 17, 2017 2:02 AM