ठाणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपात युती झाली असताना ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेबरोबर दगाबाजी केली. शिवसेनेच्या पारड्यात अध्यक्षपद येत असतानाही भाजपाने काँग्रेस आणि राष्टÑवादीला सोबत घेऊन फेडरेशनवर कब्जा केला. यामुळे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मजूर फेडरेशनचे संचालक यांच्यात नाराजी निर्माण झाली असून खासदार कपिल पाटील यांच्यासाठी आगामी निवडणुकीत काम न करण्याचा इशारा दिला आहे.
येत्या लोकसभा निवडणुकीतच युतीतील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि मजूर फेडरेशनच्या कार्यकर्त्यांच्या असहकाराला सामोरे जावे लागणार आहे. पाटील यांनी युतीचा धर्म आणि पालकमंत्र्यांना दिलेला शब्द न पाळता मनमानी करून मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत शिवसेनेला दगा देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत सत्ता मिळवली. मागील २० वर्षांपेक्षा जास्त काळ मजूर फेडरेशनवर भाजपाचा वरचष्मा आहे.
मजूर फेडरेशनच्या २१ संचालकांच्या निवडणुकीत भाजपा-६, राष्ट्रवादी-१, काँग्रेस-२, अपक्ष-२ , बहुजन विकास आघाडी-१ आणि शिवसेना-९ असे संख्याबळ असताना अध्यक्षपद हे शिवसेनेला मिळू शकणार होते. फेडरेशनवर सत्ता मिळवण्यासाठी पाटील यांनी युतीचा धर्म न पाळता शिवसेनेला एकाकी पाडून काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष आणि बहुजन विकास आघाडी यांची मोट बांधून पुन्हा मजूर फेडरेशन आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले.मजूर फेडरेशन निवडणुकीत शिवसेनेला अध्यक्षपद मिळू नये, म्हणून जाणीवपूर्वक युतीचा धर्म तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत फेडरेशनवर सत्ता काबीज करून शिवसेनेच्या हातावर तुरी देण्यात आल्या. मजूर फेडरेशन, बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मनमानी करून घरातील माणूस अध्यक्षपदी बसवला. त्यामुळे आगामी निवडणुकीत कपिल पाटीलव्यतिरिक्त अन्य उमेदवार दिल्यास शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते युतीचा धर्म पाळतील, अन्यथा नाही.- अरु ण पानसरे,शिवसेना पदाधिकारी आणि मजूर फेडरेशन संचालक
मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांनी युतीचा धर्म पाळला नाही. शिवसेनेला संख्याबळानुसार फेडरेशन अध्यक्षपद मिळाले असते. परंतु, पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याशी युती करून सत्ता मिळवून नातेवाइकांची वर्णी लावून घराणेशाहीची परंपरा राबवली.- पंडित पाटील,मजूर फेडरेशन संचालक