लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोविडच्या निमित्ताने केलेल्या जम्बो खरेदीवर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला असताना शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मात्र पवारांव्यतिरिक्त भाजपच्या एकाही नगरसेवकाने या विषयावर चर्चा केली नाही. तर खरेदी शासनाच्या दराने योग्य पद्धतीने झाली असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी ठणकावून सांगितल्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना सेंटर व क्वारंटाइन सेंटरसाठी २७ हजार उशी कव्हर, २१ हजार बेडशीट, २१ हजार टॉवेल, १८ हजार नॅपकिन, १४ हजार बादल्या, ३ हजार कचऱ्याची सुपडी, १ हजार गूडनाईट मशीन, १ हजार कंगव्यांबरोबरच २ हजार बॉलपेन आदी साहित्याची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जम्बो खरेदी केली आहे. विशेष म्हणजे अधिकाºयांसाठी प्रत्येकी १५ हजारांच्या नऊ लाखांच्या आॅफिसर्स चेअर्स खरेदी करण्यात आल्या. तर क्वारंटाइन केंद्रातील अन्नपुरवठा, मृतदेहांची वाहतूक, कचरा वाहतूक आदींचीही कोट्यवधींची बिले अदा झाली आहेत. खर्च अवाढव्य पण रुग्णांना फायदा काय? अशी ठाणे शहरातील स्थिती असल्याचा आरोप पवार यांनी केला होता. हे विविध खरेदीचे प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते.
हे विषय महासभेच्या पटलावर आले तेव्हा यावर पवार वगळता एकाही भाजपच्या नगरसेवकाने त्यांना साथ दिली नसल्याने ते एकटे पडले. विशेष म्हणजे क्वारंटाइन केलेल्या डॉक्टरांवर झालेल्या खर्चाचा मुद्दादेखील त्यांनी उपस्थित केल्याने महापौरांनी मात्र या आरोपाला सडेतोड उत्तर दिले. कोरोना काळात डॉक्टरांनी आपले कर्तव्य केले असून हा मुद्दा उचलणे योग्य नसल्याचे म्हस्के म्हणाले. ज्या विषयावर चर्चा करायला पाहिजे त्यावर चर्चा न करता भलत्याच विषयावर भाजपचे नगरसेवक चर्चा करीत असल्याचे ते म्हणाले.