उल्हासनगर : विशेष समिती सभापतीपदाच्या मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाने व्हीप बजावला आहे. मात्र, महापौरपद हुकल्याने संतप्त झालेले ओमी कलानी यांनी व्हीप फेटाळून लावणार असल्याचे सांगत साई पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने भाजपा-ओमी टीममधील वाद चव्हाट्यावर आला असून त्याचा फायदा शिवसेनेला होण्याची शक्यता आहे.ओमी टीमचे नगरसेवक भाजपाच्या चिन्हावर निवडून आल्याने त्यांना भाजपाचा व्हीप बंधनकारक आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता नऊ विशेष समिती सभापतीपदांची निवडणूक होणार आहे. नऊपैकी चार समिती सभापतीपदांसाठी साई पक्षाचे नगरसेवक रिंगणात आहेत. ओमी टीमचे तीन तर भाजपाचे दोन उमेदवार उभे आहेत. साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांच्या नकारघंटेमुळे महापौरपद मिळत नाही, असा समज ओमी यांचा झाला आहे.ओमीसमर्थक नगरसेवक भाजपाच्या चिन्हावर निवडून आल्याने त्यांना भाजपने जारी केलेला व्हीप लागू होतो. मात्र, त्यांनी उल्लंघन केल्यास साई पक्षाच्या उमेदवारांना मतदान न केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यांचे नगरसेवकपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्यातील भांडणाचा फायदा शिवसेनेसह रिपाइं, काँॅग्रेस, पीआरपी, भारिप व राष्ट्रवादी पक्ष घेण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. निवडणुकीसाठी बंदोबस्त नेमण्याचा निर्णय वेळेवर घेण्यात येईल, असे मनपाने सांगितले.
भाजपाचा व्हीप अमान्य, ओमी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 3:18 AM