ठाणे : भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपानंतर अखेर शिवसेनेने भाजपवर पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून घोडबंदर भागातील अर्पण फाउंडेशनला दिलेला अन्नछत्राचा भूखंड वापरात नसल्याचे सांगून तो परत घेण्याचा ठराव शुक्रवारी झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला. त्यानुसार, या ठिकाणी आता चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव पुढील महाविशेष मंजुरीसाठी आणावा, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
अर्पण फाउंडेशन ही संस्था नेमकी कोणाची आहे, याचे उत्तर जरी सभागृहात मिळाले नसले, तरी शिवसेनेने आता अप्रत्यक्षरीत्या डुंबरे यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले. तसेच या विषयावरून गेले काही दिवस ओरडणा-या भाजप सदस्यांचा आवाज मात्र म्युट झाल्याचे दिसले.
*एमआरटीपीअंतर्गत कारवाई होणार
गेल्या काही दिवसांपासून भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना महापालिकेत रंगला आहे. भाजपने शिवसेनेच्या काही नगरसेवकांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल केला आहे. त्यानंतर, आता शिवसेनेने भाजपवर पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, शुक्रवारच्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी घोडबंदर येथे अन्नछत्रासाठी दिलेल्या जागेचा उपयोग होत नसल्याने ती नेमकी कशासाठी दिली, असा सवाल केला. याच मुद्यावर विकास रेपाळे यांनीही कोणत्या उद्देशाने ही जागा दिली, यासाठी २८ लाखांचा खर्च करून अर्पण फाउंडेशनला ती का जागा दिली, गेल्या चार वर्षांपासून त्याठिकाणी काहीच झालेले नसल्याने ती ताब्यात घेण्याची मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी याठिकाणी अनधिकृत गाळे उभारल्याचा दावाही केला. त्यामुळे या अन्नछत्राचा वापर होत नसेल, तर तो भूखंड पुन्हा ताब्यात घेण्याचा ठराव करावा, अशी मागणी केली.
महापौर नरेश म्हस्के यांनीही शहरात राष्ट्रवादी, शिवसेनेविरोधात बॅनर लावले होते. त्यावर आम्ही दोघे भाऊ-भाऊ मिळून खाऊ, अशा आशयाचा मजकूर होता. त्यानुसार, या ठिकाणी मी खाण्यासाठी गेलो असता, त्याठिकाणी काहीच नव्हते. त्यामुळे नेमके कशासाठी हे अन्नछत्र आहे, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी केली. त्यावर २०१७ मध्ये अन्नछत्राचा ठराव झाल्याची माहिती शहर विकास विभागाने केली. ६०० चौरस फुटांची जागा दिली असून त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बांधकाम महापालिकेने करण्याचे निश्चित केले होते. या उत्तरानंतर सभागृह नेते अशोक वैती यांनी या जागेचा वापर होत नसेल, तर ती ताब्यात घ्यावी, असा ठराव मांडला. तसेच त्याठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याबरोबरच अनधिकृत बांधकामांत अर्पण फाउंडेशनचा सहभाग दिसून येत असेल, तर त्याविरोधात एमआरटीपीअंतर्गत कारवाईची मागणी केली. त्यांनी मांडलेल्या या ठरावाला विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी अनुमोदन दिले.
- कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी केलेली नाही
भाजपचे नगरसेवक नारायण पवार आणि मिलिंद पाटणकर यांनी हा विषय सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना शिवसेनेचे नगरसेवक हावी झाल्याचे दिसून आले. तर, याविषयी बोलण्याचा प्रयत्न करणा-या गटनेते मनोहर डुंबरे यांचा आवाज म्युट केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर, द्वेषापोटी केलेला ठराव मंजूर केला आहे. यापूर्वी खासदार, आमदार निधीतून जी काही कामे झालेली आहेत, कोणाकोणाला निधी दिलेला आहे, त्याची माहिती पुढील महासभेत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्या ठिकाणी अर्पण फाउंडेशनने येथे कोणत्याही प्रकारची ॲक्टॅव्हिटी केलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.