ठाणे : ‘जुळता जुळता जुळतंय की’मध्ये नायक-नायिकेचे लग्न लागल्यावर पुढं काय होणार किंवा ‘तुला पाहते रे’मध्ये नायिकेचे वडील लग्नाला होकार देणार का, या व अशा ठाण्यातील लक्षावधी दर्शकांच्या मनातील प्रश्नांवर गुरुवारच्या केबलचालकांच्या ब्लॅक आउटचा काहीही परिणाम होणार नाही. केबल बंद झाले तरी वेगवेगळ्या वाहिन्यांचे अॅप्स मोबाइलमध्ये डाउनलोड करून किंवा एकाच घरात केबलबरोबर डिश टीव्ही असल्यास त्यावर या मालिका पाहून दर्शक आपले कुतूहल शमवू शकतात. त्यामुळे केबलचालकांच्या ब्लॅक आउटचा ‘टाय टाय फिश’ होण्याची शक्यता आहे.ठाणे शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात असून सरकारी आकडेवारीनुसार संपूर्ण जिल्ह्यात केबलग्राहकांची संख्या एक लाख ४२ हजार आहे. केबलचालक संघटनेच्या दाव्यानुसार ही संख्या दोन लाखांच्या घरात असल्याचे मान्य केले, तरीही बहुतांश दर्शक हे डिश टीव्हीवर किंवा मोबाइलमध्ये वेगवेगळ्या चॅनल्सचे अॅप डाउनलोड करून किंवा डीटीएच वाहिन्यांचे अॅप्स डाउनलोड करून या सिरीयल्स पाहत असल्याने घरातील केबलवाहिनी सायंकाळी ७ ते १० बंद राहिली, तरी दर्शकांच्या मनोरंजनात आडकाठी येणार नाही. याखेरीज, या सिरीयल्सचे आदल्या दिवशी झालेले एपिसोड दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवण्याची सोय असल्याने ज्यांनी आपल्या स्मार्ट फोनमध्ये वाहिन्यांचे अॅप्स डाउनलोड केलेले नाहीत, त्यांना रात्रभर आपली उत्कंठा ताणून धरत शुक्रवारी सकाळी हे एपिसोड पाहता येतील. याखेरीज, समजा एखाद्याला शक्यच झाले नाही, तर यु-ट्युबवर अल्पावधीत हे एपिसोड पाहण्याची सोय आहे. रिलायन्स कंपनीचे जिओ फोन ठाण्यात अनेकांनी घेतले असून त्या फोनचा वापर ते फुकट उपलब्ध असलेल्या नेटच्या माध्यमातून क्रिकेट मॅच किंवा टीव्हीवरील सिरीयल्स, रिअॅलिटी शो पाहण्याकरिता करतात. ही मंडळी तर हल्ली घरात केबल असले, तरीही मोबाइलवरच मनोरंजन करून घेतात. त्यामुळे केबलवाल्यांचा ब्लॅक आउट अशा जिओ ग्राहकांच्या तर खिजगणतीत नसेल.पसंतीच्या चॅनल्सची निवड अद्याप नाहीवाहिनीनुसार पैसे घेण्याच्या दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नियमांची अंमलबजावणी येत्या दोन दिवसांत केली जाणार आहे. त्याला विरोध करण्याकरिता केबलचालकांनी ब्लॅक आउटचा निर्णय मंगळवारी झालेल्या केबल आॅपरेटर अॅण्ड ब्रॉडकास्टर असोसिएशनच्या बैठकीत घेतला. मात्र, असा ब्लॅक आउट निष्फळ ठरण्याचीच शक्यता आहे. मात्र, दोन दिवसांवर निर्णयाची अंमलबजावणी येऊनही अनेक केबलचालकांनी अजून ग्राहकांकडून त्यांच्या पसंतीच्या चॅनलची निवड करून घेतलेली नाही.
ब्लॅक आउटचा होणार टाय टाय फिश? जिल्ह्यात फक्त दोन लाख केबलग्राहक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 4:01 AM