अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वे स्थानकात झोपलेल्या एका अंध दाम्पत्याला रेल्वेच्या हमालांनी लुटल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी देखील या अंध बांधवांना जुमानले नाही.
विशाल कांबळे आणि त्यांची पत्नी हे दोघेही अंध आहेत. विशाल हे त्यांच्या पत्नीसह शेलू इथं भाड्याचं घर घेण्यासाठी गेले होते. मात्र या घरात त्यांना मुक्काम न करता आल्यानं त्यांनी अंबरनाथ रेल्वे स्थानक गाठत तिथेच रात्रभर थांबण्याचा निर्णय घेतला. रेल्वे स्थानकात हे दाम्पत्य झोपलेलं असताना कुणीतरी त्यांच्या काठ्या पळवून नेल्या. यानंतर रात्री विशाल हे लघवी करण्यासाठी जात असताना ते रेल्वे रुळात पडले आणि त्यांना इजा झाली.
यानंतर रेल्वे पोलीस आणि रेल्वेच्या हमालांनी त्यांना उचलून उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेले, मात्र तिथे दाखल न करता बाहेरच सोडून त्यांनी पळ काढल्याचा विशाल कांबळे यांचा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर रेल्वेच्या हमालांनी माझ्या खिशातले ८०० रुपये काढून घेतले, याबाबत रेल्वे पोलिसांना सांगितले असता त्यांनीही लक्ष दिले नाही असा आरोप कांबळे यांनी केला. या सगळ्या आरोपांनंतर अंबरनाथच्या रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.