ठाणे: ठाण्यात महायुतीच्या जाहीर सभेसाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सभा झाल्यानंतर पीएमसी बँकेच्या खातेदारांनी घेराव घातला. भावुक झालेल्या खातेदारांनी आमचे पैसे मिळणार का नाही?, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आता निवडणूक असल्याने सध्या काहीही करता येणार नाही, मात्र ज्या दिवशी निवडणूक संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालणार असून, यासंदर्भात निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी खातेदारांना सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांचा आश्वासनानंतर काही प्रमाणात खातेदारांना दिलासा मिळाला आहे.
रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर घातलेल्या निर्बंधानंतर सर्वच खातेदार हवालदिल झाले असून, ठाण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांनाच खातेदारांचा सामना करावा लागला. पालिका मुख्यालयाच्या बाहेर मुख्यमंत्र्यांचे जाहीर भाषण झाल्यानंतर काही खातेदारांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या आतमध्ये पीएमसी बँकेच्या विरोधात पोस्टरबाजी केली तसेच बँकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री भाषण संपवून निघत असतानाच खातेदारांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुख्यमंत्री या सर्व खातेदारांचे म्हणणे एकूण घेण्यासाठी स्वतः खातेदारांकडे गेले. त्यानंतर त्यांनी स्वतः सर्व खातेदारांचे म्हणणे एकूण घेतले. यावेळी कोणाचेही नुकसान होणार नाही असे, आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री निघून घेल्यानंतर माजी खासदार किरीट सोमय्या याना खातेदारांना घेराव घातला आणि त्यांनी याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली. किरीट सोमय्या यांनी देखील यासंदर्भात तपास वेगाने सुरु असून विशेष ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर तपासाला आणखी वेग येणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले .
पालिकेच्या सुरक्षेची ऐशीतैशी पीएमसी बँकेच्या खातेदारांनी थेट पालिका मुख्यालयाच्या आतमध्येचे आंदोलन करून बँकेच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने पालिकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . एरवी होणारी आंदोलने ही पालिका मुख्यालयापासून काही अंतरावर होत असतात. मात्र मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा पालिका मुख्यालयाला लागून असताना या सर्व आंदोलक खातेदारांना पालिका मुख्यालयात प्रवेश कोणी दिला, असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.