ठाणे : दुकानाचा गाळा विकून ताबा दिल्यावरही ग्राहकाला विविध अडथळे निर्माण करणाऱ्या रिहाशीश बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सने ग्राहकाला ३० हजार नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत.मीरा रोड येथील अंजुमानरा खान यांनी रिहाशीश बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सच्या नालासोपारा येथील प्रकल्पातील दुकानाचा गाळा ५ लाखांना विकत घेतला. संपूर्ण रक्कम दिल्यावर बिल्डर्सने आॅक्टोबर २०१० मध्ये ताबा देऊन नोव्हेंबर २०१० मध्ये नोंदणीकृत करारनामा केला. नंतर, खान यांनी बिल्डर्सकडे काही कागदपत्रांची मागणी केल्यावर त्यांना त्रास देणे सुरू केले. खान यांनी बिल्डर्सची पोलिसांत तक्रारी केली. ती कागदपत्रे खान यांनी वसई-विरार महानगरपालिकेकडे माहितीच्या अधिकाराखाली मागवली असता संबंधित संस्थांनी आपण बांधकामासाठी परवानगी दिली नसल्याचे जून २०१४ च्या पत्राद्वारे खान यांना कळवले. याशिवाय, इतर मागण्यांची पूर्तता केली नाही. त्यामुळे खान यांनी बिल्डर्सला नोटीस दिली. मात्र, त्यालाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे खान यांनी बिल्डर्सविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली. ती नोटीस अपूर्ण पत्ता या शेऱ्यासह परत आल्याने त्यांनी एका वृत्तपत्रात जाहीर नोटीस दिली. त्यानंतरही बिल्डर्स गैरहजर राहिले.कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता करारानुसार खान यांनी रिहाशीश बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सच्या प्रकल्पातील गाळा ५ लाखांना विकत घेतला. ५ लाख बिल्डर्सला दिल्याची पोचही आहे. तर, स्थानिक स्वराज्य संस्थेने आपण परवानगी दिली नसल्याचे म्हटले असले, तरी त्याकामी सखोल चौकशी किंवा खातरजमा मंच करणार नसल्याचे मंचाने स्पष्ट केले आहे. मात्र, दुकानाचा गाळा असलेली इमारत अनधिकृतपणे उभारली असल्याचे खान यांनी म्हटले आहे. त्याचे खंडन किंवा कोणतेही स्पष्टीकरण बिल्डर्सने केलेले नाही. खान यांनी ५ लाख रक्कम धनादेशाद्वारे दिली असली तरी धनादेशावर पाटील असे नाव आहे. तसेच पासबुकचा खातेउताराही त्यांनी दिला नाही. त्यामुळे व्यवहाराबाबत शंका आहे. मात्र, ५ लाख रुपये मिळाल्याची पोच बिल्डर्सने खान यांना दिली असून त्याबदल्यात गाळाही दिला. तो वापरण्यादरम्यान त्यांनी खान यांना अडथळे निर्माण करून त्रुटीची सेवा दिली आहे, असे मंचाने स्पष्ट केले. त्यामुळे रिहाशीश बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सने खान यांना २५ हजार नुकसानभरपाई आणि ५ हजार तक्रार खर्च द्यावा, असे आदेश मंचाने दिले आहे. (प्रतिनिधी)
गाळावापरातील अडथळा बिल्डरला पडला महागात
By admin | Published: April 10, 2017 5:46 AM