लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी - तालुक्यातील वडूनवघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या बौद्ध वस्तीत जाणाऱ्या रस्त्याची काही समाजकंटकांनी अडवणूक केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. या घटनेने वडूनवघर ग्रामपंचायत हद्दीतील बौद्ध समाजातील नागरिकांच्या रस्त्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भिवंडी तालुक्यातील वडूनवघर ग्रामपंचायत हद्दीत बौद्ध वस्ती असून गावातील मुख्य रस्त्यावरून बौद्ध वस्तीत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे व काँक्रिटीकरणाचे काम ग्रामपंचायतीकडून सुरू होते.मात्र या रस्त्याची दुरुस्ती करायची नाही, हा रस्ता आमच्या मालकीचा आहे म्हणून आम्ही या बौद्ध वस्तीत जाणाऱ्या नागरिकांना रस्ता देणार नाही अशी भूमिका या गावातील सदानंद शंकर पाटील,अजय केशव पाटील,धीरज चंद्रकांत पाटील,उषा केशव पाटील,भीमाबाई रविकांत पाटील यांनी घेत बौद्ध वस्तीत जाणारा रस्ता अडवला असून रस्त्यावर माती भराव टाकून रस्त्याची अडवणूक केली असल्याची तक्रार रहिवासी कैलास गायकवाड यांच्यासह बौद्ध वस्तीतील स्थानिक नागरिकांनी तालुका पोलिसांसह तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
जर या रस्त्यावरून बौद्ध वस्तीतील नागरिक गाडी अथवा पायी ये जा करू लागले तर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करू अशी धमकी देखील या नागरिकांनी बौद्ध वस्तीतील नागरिकांना दिली असल्याने वडूनवघर येथील बौद्ध वस्तीतील नागरिक प्रचंड मानसिक तणावात आले असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या रस्त्यासंदर्भात तक्रार निवेदन प्राप्त झाला असून वडूनवघर ग्राम पंचायतीच्या ग्रामसेवकांना बौद्ध वस्तीत जाणारा रस्ता लवकरात लवकर बनविण्याचे निर्देश देण्यात आले आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे यांनी दिली आहे.
बौद्ध वस्तीत जाण्यासाठी येथून जुना रस्ता होता आता त्याचे दुरुस्ती काम सुरु होते मात्र काही नागरिकांनी त्यास विरोध केला आहे त्याबाबत वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया वडूनवघर ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक विलास पाटील यांनी दिली आहे.