ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णांलयांकडून सुरु असलेली लुट थांबवावी अशी मागणी ठाण्यातील अनेक सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार पालिकेने आता खाजगी रुग्णालयांसाठी दरपत्रक जाहीर केले आहे. मात्र हे दरपत्रक सर्वसामान्यांबरोबर मध्यमवर्गीयांनाही न परवडणारे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार सामान्य, शेअरींग, स्वतंत्र आणि अतिदक्षता विभागासाठी प्रतिदिन दर निश्चित करण्यात आले असून त्याप्रमाणे करोनाबाधित रु ग्णांना उपचारासाठी आता प्रतिदिन चार ते दहा हजार रु पये इतका खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णाला १४ ते १८ दिवस रुग्णालयात राहावे लागले तर त्याचे बील हे पूर्वीप्रमाणेच दिड ते दोन लाख किंबहुना त्यापेक्षा जास्तीचे भरावे लागणार आहे. त्यामुळे पालिकेने एकप्रकारे ठाणेकरांच्या तोंडाला पानेच पुसण्याचा हा प्रकार केला आहे. ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी गुरूवारी रु ग्णालय प्रतिनिधी, आयएमए संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन त्यामध्ये खासगी कोवीड रु ग्णालयात उपचाराचे दरपत्रक निश्चिात केले. त्यानुसार जनरल वॉर्डमध्ये उपचारासाठी रु ग्णाकडून प्रतिदिन चार हजार रु पये आकारले जाणार आहे. त्यात बेड चार्जेस, डॉक्टर तपासणी शुल्क, पीपीई किट आणि जेवणाचा खर्च यांचा समावेश आहे. शेअरींग कक्षातील उपचारासाठी प्रतिदिन पाच हजार तर स्वतंत्र कक्षातील उपचारासाठी प्रतिदिन सात हजार रु पये आकरले जाणार आहेत. त्यात रु ग्ण खोली, डॉक्टर तपासणी शुल्क, पीपीई किट आणि जेवणाचा खर्च यांचा समावेश आहे. तर अतिदक्षता विभागासाठी प्रतिदिन दहा हजार रु पये आकारले जाणार असून व्हेंटीलेटरसाठी अतिरिक्त प्रतिदिन दोन हजार रु पये आकारले जाणार आहेत. प्रत्यक्ष वापरात आलेली औषधे आणि सर्जिकल साहित्याचा खर्च यामध्ये बाजारभावापेक्षा १५ टक्के कमी दराने आकारणी करण्यात येणार आहे. याशिवाय, इन्शुअर्ड रु ग्ण तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. अशा रु ग्णांकडून नेहमीच्या दराने उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.एकूणच ठाणेकर किंवा सर्वसामान्य नागरीकांना,मध्यमवर्गीयांना पालिका दिलासा देईल असे वाटत होते. मात्र पालिकेने या सर्वांच्या तोडांला पाने पुसविण्याचा प्रकार केला आहे. दिलासा देण्याऐवजी खिशाला कात्री लावण्याचाच हा प्रकार असल्याचे आता बोलले जात आहे. त्यामुळे आता या विरोधात आवज उठविणारे पालिकेच्या या भुमिकेबाबत काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
खाजगी हॉस्पीटलचे दर सर्वसामान्यांना न परवडणारेच पालिकेने केली ठाणेकरांची फसवणुक, पालिकेने केले दरपत्रक निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 2:37 PM