लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : चिखलोली धरण क्षेत्रात रासायनिक कचरा टाकल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई सुरु केली आहे. प्राथमिक अहवालाच्या आधारावर हे रसायन याच परिसरातील डीजीकेम कंपनीचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या कंपनीचे पाणी आणि वीज कापण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणातील सविस्तर अहवाल आल्यावर त्या अहवालाच्या आधारावर कंपनीवर आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. अंबरनाथ पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातच ४८ टनपेक्षा जास्त रासायनिक कचरा टाकण्यात आला होता. पावसामुळे हे रसायन थेट धरणात जाणार होते. मात्र याची माहिती मिळाल्यावर स्थानिकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर या प्रकरणात प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपली कारवाई सुरु करत टाकण्यात आलेल्या रसायनांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा प्राथमिक अहवाल पाहता हे रसायन एमआयडीसीच्या प्लॉट क्रमांक एन ७१ मधील डीजीकेम कंपनीतील असल्याचे समोर आले आहे. त्या आधारावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करत कंपनीचे पाणी आणि वीज जोडणी तोडण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. दरम्यान, या कंपनीतील टाकाऊ रसायन हे तळोजा येथील प्रक्रिया केंद्रात पाठवणे गरजेचे होते. मात्र तो खर्च वाचवण्यासाठी हे रसायन उघड्यावर टाकण्यात आले हाते. त्यामुळे प्रथमदर्शी आढळलेल्या तपासणीनुसार हा कचरा डीजीकेम कंपनीचाच असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण विभागीय मंडळाचे अधिकारी धनंजय पाटील यांनी सांगितले. चिखलोली धरणाजवळ हा कचरा आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
डीजीकेम कंपनीवर मंडळाची कारवाई
By admin | Published: June 30, 2017 2:44 AM