भिवंडी : भिवंडीतील कोरोनाबाधितांच्या आकड्याने एक हजारांचा टप्पा ओलांडला असल्याने भिवंडीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. शहरात कोरोना व इतर आजारांतील रुग्णांच्या मृत्यंूचे प्रमाण वाढले असून मुस्लिमबहुल परिसरात असलेल्या मशिदींच्या कबरस्तानात जागा नसल्याचे फलक लावले आहेत. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे फलक लागल्याचे बोलले जात आहे. शहरात १ जूननंतर कोरोना व इतर आजारांतील रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. शहरात २२ कबरस्ताने आणि २१ स्मशानभूमी या ठिकाणी दररोज अंत्यसंस्कार व दफनविधी पार पडत असून शांतीनगर भागातील गैबीपीर कबरस्तान या ठिकाणी जूनमध्ये १८ दिवसांत तब्बल ८६ मृतदेह दफन करण्यात आले. त्यात काही कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह असून इतर मृतदेह वेळेवर उपचार मिळू न शकलेल्या वयस्क व्यक्तींचे असल्याचे गैबीपीर कबरस्तानाचे विश्वस्त अक्र म अन्सारी यांनी सांगितले आहे.सध्या दररोज पाच ते आठ मृतदेहांचे दफन विविध कबरस्तानांत होत असल्याने कबर खोदणारेही अधिकच्या कामाच्या ताणाने आजारी पडले असून आता परिसरातील युवकांकडून कबर खोदण्याचे काम करून घेण्याची वेळ आल्याची माहिती दिली. स्थानिक पोलिसांकडून कबरस्तानाची देखरेख पाहणाऱ्या विश्वस्तांना नोटिसा बजावून मृतांची दरदिवशी माहिती देण्याचे बंधन टाकले आहे. शहरातील गैबीपीर कबरस्तानासारखीच परिस्थिती रेहमतपूर कबरस्तान, पाच पीर कबरस्तान, बडा कबरस्तान, कोटरगेट कबरस्तान, आसबीबी कबरस्तान येथे आहे.>शहरातील कल्याण रोड येथील आसबीबी जामा मशीद येथे ‘तुम्हा सगळ्यांना कळवण्यात येत आहे की, आसबीबी कबरस्तानमध्ये जागा जास्त नाही म्हणून शहरात ज्या कबरस्तानात ही सहुलत असेल, कृपया मय्यतची तदफिन (दफन करणे) तिथेच करावी’ असा फलक लावण्यात आला आहे.>कल्याण-डोंबिवलीत नवे २५४ रुग्णकल्याण: केडीएमसी परिक्षेत्रात रविवारी २५४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. कल्याण पूर्वेतील ५३ वर्षीय एका स्त्रीरोगतज्ज्ञाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते तापाच्या दवाखान्यात सुरुवातीपासून कार्यरत होते. कोरोना आजारातून बरे झालेल्या ६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत महापालिका क्षेत्रात ३५११ रुग्ण आढळून आले आहेत.
CoronaVirus News : दफनविधीसाठी जागा नसल्याचे भिवंडीच्या कब्रस्थानात बोर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:25 AM