उल्हासनगर : शिक्षण मंडळ विभाग वुडलँड इमारतीऐवजी महापालिका मुख्यालयात हलविण्याची मागणी भाजपने केली. मंडळातील घोटाळे उघड होऊ नये म्हणून यापूर्वी मुख्यालयात स्थलांतरित केलेले शिक्षण मंडळ पुन्हा वुडलँड इमारतीमध्ये हलविल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी केला आहे.
महापालिका शिक्षण मंडळाला यापूर्वी स्वतंत्र दर्जा होता. त्यांचा कारभार आयुक्त यांच्या अंतर्गत व निवडलेल्या सदस्य, सभापतींमार्फत चालत होता. दरम्यान, सरकारने महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त करून त्यांचा समावेश महापालिका शिक्षण विभागात केला. तेव्हापासून सदस्य व सभापतींची निवड बंद होऊन आयुक्त अंतर्गत कारभार चालतो. मात्र, उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे कार्यालय महापालिका मुख्यालयापासून दूर वुडलँड या व्यावसायिक इमारतीमधून कारभार चालतो. कर्मचारी, शिक्षक व इतर कामाच्या सोईच्या दृष्टीने शिक्षण मंडळाचे कार्यालय महापालिका मुख्यालयात हलविण्याची मागणी झाली होती. तत्कालीन आयुक्तांनी शिक्षण मंडळाचे कार्यालय महापालिका मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू केले होते.
दरम्यान, राजकीय दबावाखाली पुन्हा तत्कालीन आयुक्तांनी शिक्षण मंडळाचे कार्यालय वुडलँड इमारतीत स्थलांतरित केल्यावर शहरातून टीकेची झोड उठली. गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत पुरस्वानी, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, नगरसेवक मनोज लासी, राजेश वधारिया आदी भाजप नगरसेवकांनी आक्रमक होत शिक्षण मंडळाचे कार्यालय महापालिका मुख्यालयात आणण्याची मागणी केली. आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनीही मंडळाचे कार्यालय स्थलांतरित करण्याचे संकेत दिले आहेत.
चौकट
पूर्णवेळ हवा प्रशासन अधिकारी
महापालिका शिक्षण विभागाला पूर्णवेळ प्रशासन अधिकारी हवा. नेहमी गैरहजर वा रबरी स्टॅम्प प्रशासन अधिकारी नको अशी भूमिका नगरसेवक मनोज लासी यांच्यासह इतर नगरसेवकांनी घेतली. तसेच सर्वच महापालिका शिक्षण मंडळाने अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पार पडली. मात्र, शिक्षण मंडळाने प्रक्रिया पूर्ण न केल्याने मंडळातील सावळागोंधळ उघड झाला आहे.