उल्हासनगर : वादात सापडलेले महापालिका शिक्षण मंडळाचे कार्यालय वुडलँड इमारतीतून मुख्यालय इमारतीत स्थलांतरित झाले. मुख्यालयातीळ शिक्षण मंडळाच्या कार्यालयाचे उदघाटन आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते झाले असून यावेळी मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
महापालिका मुख्यालयातून शिक्षण मंडळाचे कार्यालय वुडलँड इमारती मध्ये १९ वर्षांपूर्वी स्थलांतरित केल्यानंतर, मंडळ कार्यालयातील विविध गैरप्रकार गाजले. सहा महिन्यापूर्वी मंडळाची झाडाझडती आयुक्तांनी घेतल्यावर कार्यालयातील हजेरीबुक एक नव्हेतर अनेक असल्याचे उघड झाले. तसेच कार्यालयात चोरीचा प्रकार घडला असून याप्रकरणी तत्कालीन प्रभारी प्रशासन अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. याव्यतिरिक्त तत्कालीन एका प्रशासन अधिकाऱ्यांसह अन्य जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. यासर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी शिक्षण मंडळ कार्यालय महापालिका मुख्यालयात स्थलांतरित करण्याची मागणी झाली. दरम्यान मंडळाचे कार्यालय मुख्यालयात आणले होते. मात्र राजकीय हस्तक्षेप झाल्याने, अवघ्या तीन महिन्यात पुन्हा कार्यालय वुडलँड इमारती मध्ये हलविण्यात आले. अखेर शिक्षण मंडळाच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर, मंडळाचे कार्यालय स्थलांतरित झाले आहे.
गुरवारी नव्याने बांधण्यात आलेल्या शिक्षण मंडळाच्या कार्यालयाचे उदघाटन आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते फित कापून झाले. यावेळी मुख्य लेखापरीक्षक शरद देशमुख, उपमुख्यलेखा अधिकारी नीलम कदम यांच्यासह मंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. खेमानी येथील महापालिका शाळेचे बांधकाम गेल्या ४ वर्षांपासून लटकल्याने, शाळेतील हजारो मुले एका खाजगी शाळेच्या छताखाली शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. तर कॅम्प नं-५, मच्छी मार्केट येथील शाळेच्या मैदानांवर एका खाजगी संस्थेने सनद काढल्याचा प्रकार उघड झाला. तर महापालिका शाळा व मैदाने भूमाफियांच्या रडारवर आहेत. याबाबत राजकीय पक्षाचे नेते मुंग गिळून आहेत. शिक्षण मंडळाचे कार्यालय पालिका मुख्यालयात आल्याने, या गैरप्रकारावर नियंत्रण येणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच शाळेचा दर्जा सुधारून शाळांना पूर्वीचे वैभव मिळणार असल्याची आशा व्यक्त होत आहे