उल्हासनगर : शहरातील दुकानावरील मराठी पाट्यावरून महापालिकेने आक्रमक भूमिका घेतली असतांना दुसरीकडे गोलमैदानाच्या महापालिका योगाकेंद्रांची पाटी इंग्रजीत असल्याचे उघड झाले. याबाबत कारवाईचे संकेत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिले असून योगा केंद्राच्या ताब्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उल्हासनगर महापालिकेने मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकांना विरोधात आक्रमक भूमिका घेऊन दंडात्मक कारवाई सुरू केली. मात्र महापालिका मालकीचे असलेले गोलमैदान येथील योगाकेंद्राचे नामफलक इंग्रजी मध्ये असून त्यावर आमदार कुमार आयलानी यांचा फोटो आहे. गोलमैदान ग्रीन परिक्षेत्रात मोडत असतांनाही मैदानात बांधकामे झाले आहेत. मैदानाचे विभाजन अनेक तुकड्यात करून काही तुकडे भाडेतत्वावर दिले. आमदार कुमार आयलानी यांच्या आमदार निधीतून मैदानाच्या एका बाजूला योगाकेंद्र व त्याशेजारी बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले. योगाकेंद्र व बॅडमिंटनचा ताबा महापालिकेकडे की अन्य कोणाकडे? असा प्रश्न इंग्रजी पाटीवरून निर्माण झाला. महापालिकेची कोणतीही परवानगी नसतांना दोन्ही केंद्र खाजगी संस्था वापरत असून महापालिका अधिकारी राजकीय दबावाखाली कोणतीही कारवाई करीत नसल्याची टीका होत आहे.
आमदार कुमार आयलानी महापालिका गोलमैदान येथे आमदार निधीतून नागरिकांसाठी योगाकेंद्र बांधले आहेत. योगाकेंद्रांचा ताबा महापालिका व योगाकेंद्र चालकाकडे असून केंद्रावरील पाटीबाबत कल्पना नाही.
अशोक नाईकवाडे (उपायुक्त महापालिका) गोलमैदानात बांधण्यात आलेले योगाकेंद्र महापालिकेच्या मालकीचे असून त्याचा ताबाही महापालिकेकडे आहे. मात्र काहीजण मोफत योगाकेंद्र चालवीत आहेत.
अनिल खतूरानी (सहायक आयुक-महापालिका) गोलमैदान येथील योगाकेंद्रांचे नामफलक इंग्रजी मध्ये असून त्या पाठीवर कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. लवकरच केंद्रावर मराठी पाटी लावण्यात येणार आहे.