पालघर : समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वाऱ्यामुळे लाकडी फळ्या उचकल्याने सागरिका नावाची बोट बुडाली. मात्र जवळच्या बोटी धावून आल्याने बुडालेल्या बोटीवरील १५ मच्छीमारांचे प्राण थोडक्यात बचावले. सागरिका बोट मुरबे येथील मच्छीमार प्रवीण कमलाकर तरे यांची होती.
मुरबे बंदरातून रवाना झालेली ही बोट सोमवारी संध्याकाळी समुद्रात लाटांवर आपटली. त्यात बोटीच्या खालच्या भागातील लाकडी फळ्या उचकल्या. त्यामुळे पाणी शिरून बोट बुडू लागली. बोटीत असलेल्या वायरलेस सेटद्वारे मदतीसाठी संपर्क साधण्यात आला. काही अंतरावर असलेल्या जितेंद्र तरे यांनी आपली जयलक्ष्मी बोट मदतीसाठी वळवली. बुडत्या बोटीला वाचविण्याचे अनेक प्रयत्न झाले तरी अखेर ती बुडाली.